CoronaVirus Lockdown : सीपीआर प्रशासनावर ताण, तपासणीसाठी दिवसभर रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 17:44 IST2020-05-19T17:40:53+5:302020-05-19T17:44:58+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात परजिल्ह्यांतील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आगमन होत असल्याने तपासणीसाठी छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय (सीपीआर)मध्ये रांगा लागल्या आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर भलताच ताण पडत आहे.

CoronaVirus Lockdown : सीपीआर प्रशासनावर ताण, तपासणीसाठी दिवसभर रांगा
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात परजिल्ह्यांतील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आगमन होत असल्याने तपासणीसाठी छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय (सीपीआर)मध्ये रांगा लागल्या आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर भलताच ताण पडत आहे.
तपासणीनंतर त्या नागरिकांना १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक आहे, तरीही अनेकजण होम क्वारंटाईनसाठी आरोग्य यंत्रणेकडे आग्रह धरत असल्याने प्रशासनासोबत त्यांचे वादावादीचे अनेक प्रसंग घडत आहेत.
मुंबई, पुण्यासह परजिल्ह्यांतील नागरिकांचे लोंढे प्रचंड प्रमाणात कोल्हापुरात येऊ लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाही तितक्याच प्रमाणात झपाट्याने वाढत आहे. मुंबई, पुणेसह रेडझोनमधील नागरिकांना कोल्हापुरात जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय प्रवेश मिळणार नसल्याचे जाहीर केले, तरीही नागरिकांचे लोंढे थांबेनात, त्यामुळे त्यांचे नाक्यावर तपासणी केल्यानंतर त्यांना पुन्हा सीपीआर रुग्णालयात तपासणीसाठी आणले जात आहे. त्यामुळे आरोग्ययंत्रणेवर कमालीचा ताण पडत आहे.
रेडझोनमधून आलेल्या प्रत्येक नागरिकांच्या घशातील स्राव तपासणी बंधनकारक असल्याने त्यांची तपासणीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढत आहे. सहकुटुंब कोल्हापुरात प्रवेश करत असल्याने त्यामध्ये महिलांसह लहान बालकांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.
याशिवाय ग्रीन झोन आणि ऑरेंज झोनमधून आलेल्यांसाठी सीपीआरमध्येच स्वतंत्र कक्ष उभारले आहेत, त्याठिकाणी फक्त स्क्रीनिंग केले जाते. याशिवाय परजिल्ह्यांत जाण्यासाठी वैद्यकीय सक्षम प्रमाणपत्र आवश्यक असल्याने ते मिळवण्यासाठीही नागरिक रांगेत थांबून आपली तपासणी करून घेत आहेत.
दिवसभर या तपासणीसाठी रांगा असल्याने परजिल्ह्यांतून आलेले नागरिक सहकुटुंब सीपीआर आवारातच आपली आणलेली शिदोरी सोडून भूक भागवत आहेत. पण या वाढत्या गर्दीमुळे आरोग्ययंत्रणेवर कमालीचा ताण पडला आहे.
अनेकजण घरी लहान मुले आहेत, असे कारण सांगून तपासणी केल्यानंतर संस्थात्मक क्वारंटाईन करण्याऐवजी होम क्वारंटाईन करावे, अशी मागणी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे करत आहेत. त्यावरून अनेकांचे वादावादीचेही प्रकार घडत आहेत.
दिल्लीहून आले २० विद्यार्थी
लॉकडाऊनमुळे दिल्लीत अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना खास रेल्वेने आणले, त्यामध्ये कोल्हापुरातील ६० विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यापैकी २० विद्यार्थ्यांची सीपीआर रुग्णालयात तपासणी करून त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले.
व्हीटीएम किटचा पुरवठा
सीपीआर रुग्णालयात रुग्णाच्या घशातील स्राव तपासणी करण्यासाठी व्हीटीएम किटचा तुटवडा भासला होता. पण सकाळी या किटचा पुरवठा मुबलक प्रमाणात झाला. त्यामुळे रुग्णांची तपासणी करण्यासाठी व्हीटीएम किटचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध झाल्याचे रा. छ. शा. म. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी दिली.