CoronaVirus Lockdown : माणुसकीचे दर्शन, शिप्पुरकर धावले मुंबईकरांच्या मदतीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 17:42 IST2020-05-22T17:22:28+5:302020-05-22T17:42:47+5:30
गड्या आपुला गाव बरा, अशीच ठायी ठायी आठवण मुंबईत राहणाऱ्या गावाकडच्या लोकांना येईल, अशीच कामगिरी गडहिंग्लज तालुक्यातील शिप्पुर तर्फ नेसरी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

CoronaVirus Lockdown : माणुसकीचे दर्शन, शिप्पुरकर धावले मुंबईकरांच्या मदतीस
रवींद्र हिडदूगी
नेसरी : गड्या आपुला गाव बरा, अशीच ठायी ठायी आठवण मुंबईत राहणाऱ्या गावाकडच्या लोकांना येईल, अशीच कामगिरी गडहिंग्लज तालुक्यातील शिप्पुर तर्फ नेसरी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन झाल्यामुळे सर्वत्र विशेषत: मुंबईतील रहिवाशांवर मोठे संकट ओढवल्यामुळे नेहमी मुंबईहून मदत मागविण्याची पायंडा असताना गावाकडच्या मंडळींनी प्रथमच मुंबईकरांनाच मदत पाठविली आहे. या मदतीचे मुंबईकरांसह इतरांनी कौतुक केले आहे.
कोरोना विषाणूचा विळखा मुंबईभोवती असल्याने सध्या मुंबईकडे सारेजणच संशयाने पहात आहेत. आजाऱ्यांशी नव्हे, आजाराशी लढायचे आहे, अशा जाहिरातीमुळे गावोगावच्या लोकांचेही मनोधैर्य वाढत आहे. त्यामुळे गडहिंग्लज तालुक्यातील शिप्पुर येथील ग्रामस्थांनी मुंबईत अडकलेल्या आपल्या परिचयाच्या सुमारे पन्नास कुटुंबीयांसाठी साहित्य जमा करुन आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे दाखवून दिले.
मुंबईहून गावी परतलेल्या लोकांसाठीही गावच्या बाहेर ग्रामस्थांनी उत्तम व्यवस्था करून त्यांचीही मने जिंकली आहेत. तांदूळ, गहूपीठ, डाळी, चटणी आदी साहित्यासह प्रत्येकाच्या नावाची यादी तयार करून ते मुंबई पाठविले आहे.
यासाठी माजी सरपंच बाबुराव शिखरे, पोलीस पाटील भरमा गुरव, सचिन भालेकर, पांडुरंग गाडे, नामदेव माटले आदींनी पुढाकार घेऊन हे काम तडीस नेले. भैरवनाथ ग्रामस्थ मंडळ, मुंबईचे अध्यक्ष प्रकाश पवार यांनी दोन्ही वेळा मुंबईहून माल वाहतूकीच्या गाड्या पाठवून मदत केली.
मुंबईकरांसाठी गावाकडून आलेली ही मदत माणुसकीचे उत्तम दर्शन देत तर आहेच, परंतु तिरस्काराच्या वातावरणात चांगले उदाहरणही घालून देत आहे. याबद्दल मुंबईकरांनीही ग्रामस्थांचे आभार मानले असून केलेल्या धडपडीबद्दल कौतुक केले आहे.