CoronaVirus Lockdown : राजारामपुरीतील शाहूनगर परिसर झाला सील, प्रांताधिकाऱ्यांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 17:25 IST2020-05-18T17:18:02+5:302020-05-18T17:25:05+5:30
राजारामपुरीतील शाहूनगरात एका घरात कोरोनाबाधित महिला सापडल्याचे आढळताच ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे परिसरातील घरांचे तसेच दुकानांचे दरवाजे उघडलेच नाहीत. किमान चौदा दिवस हा परिसर सील राहणार आहे.

कोल्हापुरातील शाहूनगर परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर सोमवारी हा संपूर्ण परिसर बॅरिकेटस् लावून सील करण्यात आला. /छाया : नसीर अत्तार
कोल्हापूर : राजारामपुरीतील शाहूनगरात एका घरात कोरोनाबाधित महिला सापडल्याचे आढळताच ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे परिसरातील घरांचे तसेच दुकानांचे दरवाजे उघडलेच नाहीत. किमान चौदा दिवस हा परिसर सील राहणार आहे.
रविवारी मध्यरात्री दीड वाजता या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे तपासणी अहवालावरून स्पष्ट झाले. पोलीस तसेच महापालिका प्रशासनाला योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार सकाळी सात वाजता महापालिका आरोग्य विभागाची पथके शाहूनगरात दाखल झाली. त्यांनी स्वच्छता तसेच औषध फवारणीचे काम तत्काळ सुरू केले. विभागीय कार्यालयाने तीनशे मीटरचा परिसर बॅरिकेटस् लावून बंद केला. करवीर प्रांत अधिकारी कार्यालयाने हा परिसर प्रतिबंधात्मक म्हणून घोषित केला. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.
प्रांताधिकाऱ्यांची भेट, शाहूनगर सील
शाहूनगरच्या आसपास मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे तीनशे मीटर परिसर सील न करता केवळ शाहूनगर सील करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. सोमवारी दुपारी करवीरचे प्रांत वैभव नावडकर यांच्यासह राजारामपुरीचे निरीक्षक नवनाथ घुगरे, उपनिरीक्षक समाधान घुगे यांनी परिसराची पाहणी करून सर्व संबंधितांना सूनचा दिल्या.
थर्मल स्कॅनिंगद्वारे तपासणी
शाहूनगरात महापालिका यंत्रणा सज्ज झाली असून, तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. मनपा कर्मचाऱ्यांनी घर सर्वेक्षणासह सर्व नागरिकांची थर्मल स्कॅनिंगद्वारे तपासणी सुरू करण्यात आली आहे. शाहूनगरात १३०० कुटुंबे राहत आहेत.