CoronaVirus Lockdown : आतापर्यंत सर्वाधिक १२२८ नागरिकांचे घेतले स्राव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 16:35 IST2020-05-14T16:33:15+5:302020-05-14T16:35:49+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या घसा आणि नाकातील स्राव घेण्यासाठीची केंद्रे वाढविल्यामुळे आजपर्यंत सर्वाधिक म्हणजे १२२८ नागरिकांचे स्राव एका दिवसात घेण्यात आले. दिवसभरामध्ये १५९२ नागरिकांची तपासणी करण्यात आली; तर ११६१ अहवाल प्रलंबित आहेत.

CoronaVirus Lockdown : आतापर्यंत सर्वाधिक १२२८ नागरिकांचे घेतले स्राव
कोल्हापूर : जिल्ह्यातील नागरिकांच्या घसा आणि नाकातील स्राव घेण्यासाठीची केंद्रे वाढविल्यामुळे आजपर्यंत सर्वाधिक म्हणजे १२२८ नागरिकांचे स्राव एका दिवसात घेण्यात आले. दिवसभरामध्ये १५९२ नागरिकांची तपासणी करण्यात आली; तर ११६१ अहवाल प्रलंबित आहेत.
दिवसभरामध्ये येथील सीपीआर रुग्णालयात ३७६ नागरिकांची तपासणी करण्यात आली; तर २५९ जणांचे स्राव घेण्यात आले. आयजीएम, इचलकरंजी येथे दिवसभरामध्ये १२१ जणांची तपासणी आणि २८ जणांचे स्राव घेण्यात आले. डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात ३३६ नागरिकांची तपासणी करण्यात आली; तर या सर्वांचे स्राव घेण्यात आले. परराज्यांतून आणि परजिल्ह्यांतून नागरिक मोठ्या प्रमाणावर येत असल्यामुळे बाराही तालुक्यांत नागरिकांचे स्राव घेण्याची सोय करण्यात आली आहे.
जिल्हाभर स्राव घेण्याची सोय झाल्यामुळे आता येथील शेंडा पार्क येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेवरही मोठा ताण आला आहे. एक हजाराहून अधिक अहवाल प्रलंबित असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना आता या अहवालांची प्रतीक्षा आहे.
आरोग्य खात्याच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत ५२२१ नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यांपैकी ३८२४ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अजूनही १३२५ अहवाल आलेले नसून ११ नमुने पुन्हा तपासण्यात आले आहेत, तर ४० नमुने नाकारण्यात आले आहेत.
तीन पॉझिटिव्ह युवकांच्या संपर्कात ७८ जण
शाहूवाडी तालुक्यातील केरले येथील पॉझिटिव्ह युवकाच्या प्रथम संपर्कामध्ये १२, तर द्वितीय संपर्कामध्ये पाचजण आले आहेत. याच तालुक्यातील माणगाव येथील पॉझिटिव्ह युवकाच्या प्रथम संपर्कात सहाजण आले असून, सातवे (ता. पन्हाळा) येथील पॉझिटिव्ह युवकाच्या प्रथम संपर्कात २५, तर द्वितीय संपर्कात ३० जण आल्याचे स्पष्ट झाले आहे.