CoronaVirus Lockdown : राज्यातील पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 13:34 IST2020-04-25T13:32:40+5:302020-04-25T13:34:47+5:30
राज्य शासनाने महाराष्ट्र राज्यात पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. त्याकरिता किमान ३५० ते ४०० एकर जागा एकाच ठिकाणी शोधण्याचे काम सुरू झाले आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर या कामाला गती येणार आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, आदी ठिकाणी जागेची पाहणी केली जाणार आहे.

CoronaVirus Lockdown : राज्यातील पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाला मंजुरी
सचिन भोसले
कोल्हापूर : राज्य शासनाने महाराष्ट्र राज्यात पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. त्याकरिता किमान ३५० ते ४०० एकर जागा एकाच ठिकाणी शोधण्याचे काम सुरू झाले आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर या कामाला गती येणार आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, आदी ठिकाणी जागेची पाहणी केली जाणार आहे.
देशाच्या प्रगतीत क्रीडा हा राष्ट्राचा मानबिंदू मानून, आंतरराष्ट्रीय संस्थांनी राष्ट्राच्या विकासाची काही नवीन मानके निश्चित केली आहेत. त्यांपैकी मानवी विकास निर्देशांकांनुसार राज्यात पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
राज्य शासनातर्फे पशुसंवर्धन, दुग्धविकास व क्रीडामंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत २ मार्च २०२० रोजी बैठक झाली. त्यात मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय खोले, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. अनिल कर्णिक, डॉ. विजय तायडे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू नीलेश कुलकर्णी, आदी नऊ तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
या विद्यापीठासाठी एकूण ३५० ते ४०० एकर इतकी जागा एकाच ठिकाणी हवी आहे. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी औरंगाबाद येथे जागेची पाहणी केली. मात्र ती पसंत पडली नाही. त्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे काम काहीअंशी थांबले असून, ते लॉकडाऊननंतर सुरू होणार आहे. त्यामुळे लॉकडाऊननंतर पुणे, सातारा, कोल्हापूर, आदी ठिकाणी जागेची पाहणी केली जाणार आहे.
देशातील अन्य क्रीडा विद्यापीठे
महाराजा भूपिंदरसिंग क्रीडा विद्यापीठ पंजाब (पतियाळा), तमिळनाडू फिजिकल एज्युकेशन अॅँड स्पोर्टस युनिव्हर्सिटी (चेन्नई), स्वर्णीम गुजराथ स्पोर्टस युनिव्हर्सिटी (वडोदरा, गांधीनगर), लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्यूट अॅँड फिजिकल एज्युकेशन (ग्वाल्हेर) व युनिव्हर्सिटी, राजस्थान स्पोर्टस विद्यापीठ, केंद्रीय राष्ट्रीय खेल विद्यापीठ (मणिपाल) यांचा समावेश आहे.
या विद्यापीठांत काय शिक्षण मिळणार
क्रीडाशास्त्र, पदवी, पदव्युत्तर, आदी खेळांत जखमी होण्याचे प्रमाण अधिक असल्याने त्यावरील उपचार, क्रीडा वैद्यकीय संशोधन, विविध खेळांसंबंधी तंत्रशुद्ध माहितीसाठी तज्ज्ञ, पुस्तके, ग्रंथालय, खेळ संशोधन विभाग, विविध खेळांसंबंधी विभाग, विविध खेळांची मैदाने, आदींचा समावेश असणार आहे.
राज्यात क्रीडा विद्यापीठाची आवश्यकता होती. ती उणीव राज्यातील पहिले क्रीडा विद्यापीठ स्थापून भरून निघेल.
- डॉ. चंद्रशेखर साखरे,
जिल्हा क्रीडाधिकारी, कोल्हापूर