CoronaVirus Lockdown : कोल्हापुरात आता दारू मिळणार घरपोच, परवानाधारकांची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 18:17 IST2020-05-13T18:15:52+5:302020-05-13T18:17:59+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सचा ग्राहकांकडून फज्जा उडविला जात आहे. दारू विक्रीच्या दुकानांसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी अजूनही हटलेली नाही. त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ग्राहकांसाठी ई-टोकनची हायटेक सुविधा राबविण्याची तयारी दर्शवली आहे.

CoronaVirus Lockdown : कोल्हापुरात आता दारू मिळणार घरपोच, परवानाधारकांची सोय
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सचा ग्राहकांकडून फज्जा उडविला जात आहे. दारू विक्रीच्या दुकानांसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी अजूनही हटलेली नाही. त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ग्राहकांसाठी ई-टोकनची हायटेक सुविधा राबविण्याची तयारी दर्शवली आहे.
त्यामुळे दारू पिण्याचा परवाना असणाऱ्यांना आता मागेल त्या कंपनीची दारू, आवश्यक त्या दुकानांतून घरपोच देण्याची सुविधा उपलब्ध होत आहे. या ई-टोकन सुविधेमुळे ग्राहकाला दारू खरेदीसाठी रांगेत उभारावे लागणार नाही. ही सुविधा येत्या दोन दिवसांत कार्यरत होत आहे.
ह्यकोरोनाह्णचा संसर्ग भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. तब्बल दीड महिन्याने उद्योग व व्यवसाय सुरू झाल्याने लॉकडाऊन असले नियमात अघोषित शिथिलता दिली आहे. पण त्याचा गैरफायदा नागरिक घेत आहेत. त्यामुळे दारू विक्रीची दुकाने असो अगर भाजी मार्केट, सर्वत्र सोशल डिस्टन्स कोणीही गांभीर्याने पाळताना दिसत नाहीत.
दारू विक्रीच्या दुकानांत तर अलोट गर्दी पहावयास मिळत आहे. दारू खरेदीसाठी दुकानाच्या दारातील रांगेत ताटकळत उभे राहणे प्रतिष्ठीत लोकांना अवघडच बनले आहे. त्यामुळे ज्या व्यक्तीकडे दारू पिण्याचा परवाना आहे, त्याने ऑनलाईन अथवा थेट दारू दुकानांत फोन करून आपली मागणी नोंदवायची आहे. त्या मागणीप्रमाणे दारू नेमून दिलेल्या वेळेत घरपोच पाठवली जाणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात दारू पिण्याचे परवानाधारक सुमारे अडीच हजारावर आहेत. त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ई-टोकन ही सुविधा महाएक्साईज डॉट कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. ही नवी हायटेक योजना आखली आहे, त्याचा प्रारंभ आज, गुरुवारपासून होत आहे. महाएक्साईजच्या संकेतस्थळावर नोंदणी करून ई-टोकन घेणे आवश्यक आहे.
या संकेतस्थळावर ग्राहकांनी आपला मोबाईल नंबर आणि नाव नमूद केल्यानंतर आपला जिल्हा, पीनकोड देऊन सबमीट करणे आवश्यक आहे. त्यानंतर ग्राहकांना आपल्या नजीकच्या दारू विक्री दुकानांची यादी येणार आहे. त्यातून आपण दुकानाची निवड करावी, दारू पोहोच करण्यासाठी विशिष्ट दिवस व वेळ नोंदविणे आवश्यक आहे. त्यानंतर नेमून दिलेल्या वेळेत दारू ऑनलाईनप्रमाणे घरी पोहोचविली जाणार आहे. या सुविधेची नियमावली आज, गुरुवारी जाहीर केली जाणार आहे.
घरपोच करणारेही निर्जंतुक
दारू घरपोच करण्यासाठी नियुक्त केलेले युवक निर्जंतुक कसे राहतील, याचा प्राधान्याने विचार केला जाणार आहे. त्या युवकांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. घरपोच सुविधेमुळे कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, याचीही काळजी घेण्यात येणार आहे. संबंधित कर्मचाऱ्यास कंपनीचे ओळखपत्रही दिले जाणार आहे.