CoronaVirus Lockdown : ‘हौसला’ने दिला गर्भवतींना ‘हौसला’, राज्यातील ६ विभागात उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 14:06 IST2020-06-10T14:00:03+5:302020-06-10T14:06:42+5:30
कोरोनाच्या लढ्यात डॉक्टर, पोलिस, प्रशासकीय अधिकारी, सफाई कामगार जीवाची बाजी लावून अविरतपणे सेवा बजावत आहेत. लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बंद होवून मानवी दिनचक्र विस्कळीत झाले. वाहतुकीची साधनेही उपलब्ध होत नव्हती. अशावेळी गरोदर मातांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांना वेळेत मदत मिळवून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड येथील डॉ. राहूल इंगळे यांनी ‘हौसला’ या व्हॉटस् अॅपग्रुपच्या माध्यमातून केलेला प्रयत्न निश्चितच वाखाणण्याजोगा आहे.

CoronaVirus Lockdown : ‘हौसला’ने दिला गर्भवतींना ‘हौसला’, राज्यातील ६ विभागात उपक्रम
शिवानंद पाटील
गडहिंग्लज : कोरोनाच्या लढ्यात डॉक्टर, पोलिस, प्रशासकीय अधिकारी, सफाई कामगार जीवाची बाजी लावून अविरतपणे सेवा बजावत आहेत. लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बंद होवून मानवी दिनचक्र विस्कळीत झाले. वाहतुकीची साधनेही उपलब्ध होत नव्हती. अशावेळी गरोदर मातांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांना वेळेत मदत मिळवून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड येथील डॉ. राहूल इंगळे यांनी ‘हौसला’ या व्हॉटस्अॅप ग्रुपच्या माध्यमातून केलेला प्रयत्न निश्चितच वाखाणण्याजोगा आहे.
या ग्रुपमध्ये राज्यातील विविध भागातील पोलिस, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, गृहिणी आदी अनेक क्षेत्रातील व्यक्ती जोडल्या आहेत. ग्रुपचे फेसबुक पेजदेखील सुरू करण्यात आले आहे. ‘हौसला’कडून गरोदर मातांच्या सेवेसाठी त्यांच्यानजीकचे हॉस्पिटल, डॉक्टर, वाहतुकीची साधने उपलब्ध करून देण्याचे काम केले जाते. लॉकडाऊनच्या काळात राज्यभरातून या उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे अनेक माता-भगिनींच्या सुखरूप प्रसुत्या झाल्या.
राज्यात पुणे, औरंगाबाद, मुंबई, अमरावती, नागनूर व लातूर या सहा विभागात हौसलाचे काम सुरू आहे. यातील अनेकजण एकमेकांना कधीही भेटले नाहीत. परंतु, सेवा भावनेतून सर्वजण काम करीत आहेत. कोणत्याही गरोदर मातेला मदतीची गरज असेल तर संबंधित विभागातील सदस्याला संपर्क करून मदतीचे आवाहन केले जाते.
या उपक्रमात डॉ. अजित कृष्णन (सिंधुदूर्ग), गौतम सुरवाडे (जळगाव), वैशाली संकपाळ (पुणे), करण बेरकर व गणेश कांबळे (मुंबई), डॉ. नागमणी रेड्डी (गडहिंग्लज), राजभाऊ भालेराव, संध्या निकाळजे व अश्विनी वाघ (पुणे) आदींसह ३०० हून अधिकजण कार्यरत आहेत.
७० मातांनी घेतला लाभ
‘हौसला’च्या कार्याला सर्व स्तरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ७० गर्भवतींना सेवा देण्यात आली आहे. राज्यातील सर्व व्यवहार सुरळीत होईपर्यंत ‘हौसला’चे काम सुरू राहणार आहे. त्यानंतरही गरजूंना सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. भविष्यात एखाद्या अद्ययावत रूग्णालयाची निर्मिती करण्याचा मानस असल्याचे ग्रुपच्या सदस्य नामगणी रेड्डी यांनी सांगितले.