corona virus : लॉकडाऊनमध्ये वीज दरवाढीचा झटका, बिलांमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 15:26 IST2020-06-23T15:22:22+5:302020-06-23T15:26:03+5:30
लॉकडाऊनमध्ये अनेकांचे उत्पन्न बुडाले. घरगुती खर्च भागवणेही कठीण झाले आहे. अशा स्थितीमध्ये महावितरणने वीजदरवाढ केली आहे. गेल्या तीन महिन्यांचे बिल एकत्र दिले असून, एप्रिलपासून ही वाढ करण्यात आली आहे. वीज दरात केलेली वाढ, वाढलेले बिल पाहून ग्राहकांना धक्काच बसला आहे.

corona virus : लॉकडाऊनमध्ये वीज दरवाढीचा झटका, बिलांमध्ये वाढ
कोल्हापूर : लॉकडाऊनमध्ये अनेकांचे उत्पन्न बुडाले. घरगुती खर्च भागवणेही कठीण झाले आहे. अशा स्थितीमध्ये महावितरणने वीजदरवाढ केली आहे. गेल्या तीन महिन्यांचे बिल एकत्र दिले असून, एप्रिलपासून ही वाढ करण्यात आली आहे. वीज दरात केलेली वाढ, वाढलेले बिल पाहून ग्राहकांना धक्काच बसला आहे.
महावितरणकडून कोरोनामुळे मार्च ते मे या तीन महिन्यांचे मीटर तपासणी केली नाही. आता लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे तपासणी केली असून बिल वाटप केले जात आहे. तीन महिन्यांचे बिल एकत्र आले आहे. महिन्याला तीनशे रुपये बिल येणाऱ्यांना तीन महिन्यांचे दोन हजार बिल आले आहे. सरासरी बिल आकारणी केली जात असली तरी एप्रिलमध्ये वाढलेले वीज दरही बिल वाढीस कारण आहे. लॉकडाऊनमध्ये अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा स्थितीत दरवाढ केल्यामुळे ग्राहकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
वहन आकार दुपटीने वाढला
वहन आकार वापर केलेल्या युनिटवर आकारला जातो. युनिटचे दर वाढल्यामुळे वहन आकारही वाढला आहे. ११० रुपये वहन आकार येणाऱ्या ग्राहकास तीन महिन्यांच्या बिलात ६९० रुपये आला आहे. यामुळे बिलात वाढ दिसून येत आहे.
तीन महिन्यांचे बिल वाढण्याची प्रमुख कारणे
युनिट दरात वाढ, मार्च ते मे महिने उन्हाळ्याचे असल्याने वीज वापरात वाढ, लॉकडाऊनमुळे घरीच नागरिक असल्याने टीव्ही, मोबाईल, आदी वीज उपकरणांचा नेहमीपेक्षा जास्त वापर.
पुढील महिन्यांत बिल कमी येणार
पावसाळा सुरू झाल्याने फॅन, एसीचा कमी वापर होतो. तसेच लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे व्यवसाय अथवा नोकरदार कामानिमित्त बाहेर जात आहेत. त्यामुळे पुढील बिल कमी येण्याची शक्यता आहे.
घरगुतीसाठीचे वाढलेले वीजदर
युनिट पूर्वीचा दर सध्याचा दर वाढ
- ० ते १०० ३.०५ पैसे ३.४३ पैसे ४० पैसे
- १०१ ते ३०० ६.९५ पैसे ७.४३ पैसे ४७ पैसे
- ३०१ ते ५०० ९.९० पैसे १०.३२ पैसे ०.४२ पैसे
- ५०१ ते १००० ११.५० पैसे ११.७१ पैसे २१ पैसे