Coronavirus Unlock : मंगल कार्यालयात विवाहास सशर्त परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 18:24 IST2020-06-24T18:22:26+5:302020-06-24T18:24:01+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील खुले लॉन, विनावातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात ५० लोकांच्या मर्यादेत विवाह करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी दिले. आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेवर कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे.

Coronavirus Unlock : मंगल कार्यालयात विवाहास सशर्त परवानगी
कोल्हापूर : जिल्ह्यातील खुले लॉन, विनावातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात ५० लोकांच्या मर्यादेत विवाह करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी दिले. आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेवर कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे.
आपत्ती व्यवस्थापन खुले लॉन, विनावातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात ५० लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टन्सिंग तसेच कोरोनाच्या सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर लग्नसमारंभ पार पाडण्यास नागरिकांकडून मागणी प्राप्त झाल्यास परवानगी देण्यात यावी, असे सूचित केलेले आहे.
त्यासाठी १) लग्नाच्या ठिकाणी प्रवेश करणाऱ्यांचे अनिवार्यतेने थर्मल स्कॅनिग करण्यात यावे. २) लग्नाच्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तींने तीनपदरी मास्क किंवा साधा कापडी मास्क किंवा रुमाल बांधणे आवश्यक. ३) प्रवेशद्वार, बैठक कक्ष, भोजन कक्ष, बाथरूम, प्रसाधनगृह येथे हात धुण्याकरिताची साधने व पुरेशा प्रमाणात सॅनिटायझर्स आवश्यक. ४) सामाजिक अंतराचा नियम काटेकोरपणे पाळण्यात यावा. ५) एक टक्का सोडियम हायपोक्लोराईड वापरून ठिकाण निर्जंतुकीकरण करण्यात यावे. ६) लग्नकार्यास उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणे बंधनकारक राहील.
परवानगीसाठी प्राधिकृत अधिकारी
- कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्र : आयुक्त
- संबंधित तालुके : तहसीलदार
- नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत : मुख्याधिकारी