लॉकडाऊनच्या धास्तीपुढे कोरोनाही फिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:20 IST2021-04-05T04:20:33+5:302021-04-05T04:20:33+5:30
कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून निर्बंध कडक करण्यासह लाॅकडाऊनचे संकेत राज्य सरकारकडून दिले जात असताना कोल्हापुरात मात्र ...

लॉकडाऊनच्या धास्तीपुढे कोरोनाही फिका
कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून निर्बंध कडक करण्यासह लाॅकडाऊनचे संकेत राज्य सरकारकडून दिले जात असताना कोल्हापुरात मात्र खरेदीसाठी उसळलेल्या गर्दीमुळे धान्यापासून ते तिखटाच्या मिरच्यांपर्यंतची दुकाने माणसांनी ओसंडून वाहत होती. कोरोना निर्बंधांचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचेच सार्वत्रिक चित्र होते. खरेदीसाठी ग्राहकांची तारांबळ तर आणलेल्या मालाच्या उठावाची चिंता विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर होती.
गेल्यावर्षी मार्चमध्ये अचानक लागलेल्या लॉकडाऊनचा कटू अनुभव गाठीशी असल्याने आता लॉकडाऊनचे संकेत मिळाल्यावर लगेचच लोकांनी बाजारात धाव घेतली आहे. आज (सोमवारी) मुख्यमंत्री घोषणा करणार आहेत, तत्पूर्वीच कोल्हापूरकर पूर्वतयारीला लागल्याचे चित्र बाजारपेठांमध्ये दिसत होते. नाशवंत फळे व भाजीपाला सोडला तर ठेवणीसाठीचे धान्य, कडधान्य, मसाले, तेल, किराणा सामान जास्तीचे खरेदी होत असल्याचे दिसत होते. लॉकडाऊनचे स्वरुप नेमके काय आहे, याची कल्पना नसल्याने पुढे अडचण नको म्हणून ही बेगमी केली जात आहे.
सध्या चटणीचा हंगाम आहे. तिखटासाठीच्या मिरच्यांनी बाजार लालभडक झाला आहे. मसाल्यांची विक्री जोरात सुरु आहे. अशातच लॉकडाऊन झाले तर काय म्हणून लोकांनी मिरची दुकानात एकच गर्दी केली होती.
पावसाळ्यात वापरण्यासाठी लागणारे व वर्षभर टिकणारे धान्य, कडधान्य खरेदीचा हा हंगाम आहे. या महिन्यातच नवीन ज्वारी, गहू व डाळी बाजारात आलेल्या असतात. त्याच्या खरेदीसाठी नियमितपणे गर्दी असते, पण रविवारी लॉकडाऊनच्या भीतीने ही गर्दी आणखी वाढली होती.
चौकट ०१
कोरोनापेक्षा रोजगाराची चिंता
लॉकडाऊनची धास्ती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती. कोरोनाच्या भीतीपेक्षा हातचा रोजगार जाईल, या चिंतेचे मळभ जास्त दाटलेले हाेते. बाजारात फेरफटका मारताना कोरोना परवडला पण लॉकडाऊन नको, अशाच प्रतिक्रिया लोकांमधून उमटत होत्या.
चौकट ०२
नागरिकांची बेफिकिरी
बाजारातील गर्दी पाहून खरंच कोरोना आहे का, असे म्हणण्याची वेळ आली आहे. मास्क आहे, पण तो बऱ्याचवेळा हनुवटीवरच लटकत आहे. एकाही विक्रेत्याच्या हातात ग्लोव्हज् नाही, साेशल डिस्टन्सच्या नावाने तर शंखच आहे. थुंकण्याचा नियमही कोणी पाळताना दिसत नाही. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर बेफिकिरी आहे.
चाैकट ०३
रविवारची सुट्टी त्यात लॉकडाऊनची धास्ती यामुळे शॉपिंग मॉल्स, बेकरी दुकानांमध्ये लोकांनी धाव घेतली. तेथे नियमांचे पालन करुन आत साेडले जात होते, पण आत गेल्यावर मात्र साेशल डिस्टन्सचा सर्वांनाच विसर पडल्याचे दिसत होते.
प्रतिक्रिया
तिखटासाठी मिरची विक्री जोरात सुरु आहे. मागणी जास्त असल्याने मालही भरपूर आणला आहे. आता लाॅकडाऊन झाले तर माल कोल्ड स्टोअरेजला ठेवावा लागणार आहे, त्याचा प्रतिकिलोचा दर साडेतीन रुपये असा आहे. साठवणुकीचा खर्च वाढल्याने दरातही वाढ होणार आहे. शिवाय लाखोंची केेलेली गुंतवणूकही अडकून पडणार आहे.
- ओमकार पेटकर, मिरची विक्रेते, लक्ष्मीपुरी
प्रतिक्रिया
मिरचीसाठी लागणाऱ्या किरकोळ मसाले विक्रीचा माझा व्यवसाय आहे, गेल्यावर्षी लॉकडाऊनमुळे विक्री करण्यावर मर्यादा आल्या, नुकसानही सोसावे लागले. आता पुन्हा लॉकडाऊन झाले तर ही केलेली गुंतवणूक कशी भरुन काढू. सरकारने निर्बंध लावावेत, पण लॉकडाऊन करुन आमच्या पोटावर पाय आणू नये.
- अमर साळोखे, मसाले विक्रेता, लक्ष्मीपुरी