कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयाला सव्वाचार कोटींचा चुना, ठेकेदार लिंबेकरचा आणखी एक कारनामा

By समीर देशपांडे | Updated: June 25, 2025 15:43 IST2025-06-25T15:40:25+5:302025-06-25T15:43:23+5:30

मुलुंड, वरळीच्या रुग्णालयाच्या बोगस दर कराराद्वारे मिळविले टेंडर

Contractor Mayur Limbekar won a tender worth Rs 4.25 crore for a government hospital in Kolhapur by showing a bogus price contract | कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयाला सव्वाचार कोटींचा चुना, ठेकेदार लिंबेकरचा आणखी एक कारनामा

कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयाला सव्वाचार कोटींचा चुना, ठेकेदार लिंबेकरचा आणखी एक कारनामा

समीर देशपांडे

कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराची एक-एक प्रकरणे बाहेर येऊ लागली आहेत. येथील फरार ठेकेदार मयूर लिंबेकर याने आणखी एका प्रकरणात मुलुंड आणि वरळी येथील शासकीय रुग्णालयांचा बोगस दर करार दाखवून सव्वाचार कोटी रुपयांचे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे (सीपीआर) टेंडर मिळवल्याचे उघडकीस आले आहे.

लिंबेकर याने आधीच्या प्रकरणात मुलुंड येथील कामगार रुग्णालयाच्या बोगस दर करारपत्राच्या आधारे चार कोटी ८६ लाख रुपयांचे टेंडर मिळविले होते. निकृष्ट आणि प्रचंड महागड्या सर्जिकल साहित्याची खरेदी करून त्यातून शासनाची लूट करण्यात आल्याचे ‘लोकमत’ने १८, १९ आणि २० जुलैला उघडकीस आणले होते. यानंतरही लिंबेकरला शासन व्हावे यापेक्षा त्याला वाचवण्यासाठीच नेते, त्यांचे वजनदार कार्यकर्ते सक्रिय झाल्याचे पाहावयास मिळाले. परंतु, पाठपुरावा सुरू ठेवल्याने अखेर चौकशी समिती, तिचा अहवाल, त्यानुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या लिंबेकर फरार आहे.

या प्रकरणाच्या कागदपत्रांची छाननी सुरू असताना हे दुसरे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात मुलुंड आणि वरळी येथील कामगार आरोग्य रुग्णालयाचे दरकरारपत्र जोडण्यात आले असून, त्याआधारे चार कोटी २८ लाख रुपयांचे टेंडर मिळवण्यात आले आहे. ज्या पद्धतीने पहिली फाईल तयार करून काेट्यवधीची लूट केली, त्याच पद्धतीने ही दुसरीही फाईल तयार करण्यात आली असून, त्यानुसार साहित्य पुरवठा करून बिलेही काढण्यात आली आहेत.

‘लोकमत’कडून पुन्हा पर्दाफाश

एका प्रकरणात बोगस कागदपत्रांच्या आधारे टेंडर मिळविल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करेपर्यंत ‘लोकमत’ने पाठपुरावा केला. परंतु, गेली दोन महिने लिंबेकर फरार असून, त्याने जामिनासाठी केलेला जिल्हा न्यायालयातील अर्ज फेटाळण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Contractor Mayur Limbekar won a tender worth Rs 4.25 crore for a government hospital in Kolhapur by showing a bogus price contract

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.