HSC Result 2022: बांधकाम कामगाराच्या लेकीची "आकांक्षा" पूर्ण, उच्च शिक्षणासाठी पाठबळाची गरज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 16:31 IST2022-06-09T16:23:14+5:302022-06-09T16:31:03+5:30
आकांक्षाने दहावीत ९२ टक्के गुण मिळून देखील घरच्या गरीब परिस्थितामुळे तिला उच्च शिक्षण न शिकविण्याची घरच्यांची इच्छा होती.

HSC Result 2022: बांधकाम कामगाराच्या लेकीची "आकांक्षा" पूर्ण, उच्च शिक्षणासाठी पाठबळाची गरज
विक्रम पाटील
करंजफेण : घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची असताना देखील जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाच्या बळावर पन्हाळा तालुक्यातील माजनाळ येथील आकांक्षा कृष्णात गुरव या विदयार्थींनीने बारावीच्या परीक्षेत ८८.६७ टक्के गुण मिळवून आई वडीलांची आकांक्षा पूर्ण केली. तिचे वडील सेंट्रींग कामगार आहेत. तिची जिल्हाधिकारी होण्याची इच्छा आहे. परंतू तिच्या स्वप्नाच्या आड घरची गरीबी येत असल्याने तिला समाजातील दानशूर मंडळींकडून आर्थिक पाठबळाची गरज आहे.
आकांक्षा ही कळे येथील विठ्ठलराव पाटील ज्युनिअर काॅलेजची विदयार्थीनी असून तिचे वडील सेंट्रींग कामगार तर आई मोलमजूरी करते. आकांक्षाने दहावीत ९२ टक्के गुण मिळून देखील घरच्या गरीब परिस्थितामुळे तिला उच्च शिक्षण न शिकविण्याची घरच्यांची इच्छा होती.
नियमीत पायी सहा कि.मी तर एस.टी.बसने प्रवास
मात्र विद्यालयातील काही शिक्षकांनी आकांक्षामध्ये असलेली गुणवत्ता पाहून तिला बारावी पर्यंत तरी शिकविण्याचा घरच्यांना सल्ला दिला. त्यानुसार तिने जिद्दीने शिक्षण घेऊन एस.टी.बसने पंधरा कि.मी. प्रवास तर पायी सहा की.मी.नियमीत खडतर प्रवास करून नियमीत अभ्यासाच्या जोरावर कला शाखेमध्ये विठ्ठलराव पाटील महाविद्यालयात पहिला येण्याचा मान मिळवून घरच्यांचा व शिक्षकांचा विश्वास सार्थ ठरविला आहे.