कुंभोज ग्रामसचिवालय इमारत बांधकाम लांबणीवर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:21 IST2021-04-05T04:21:33+5:302021-04-05T04:21:33+5:30
कुंभोज: अनेक वर्षे रेंगाळलेला कुंभोजच्या ग्रामसचिवालय इमारत बांधकामाचा प्रश्न सुटला असून ...

कुंभोज ग्रामसचिवालय इमारत बांधकाम लांबणीवर?
कुंभोज: अनेक वर्षे रेंगाळलेला कुंभोजच्या ग्रामसचिवालय इमारत बांधकामाचा प्रश्न सुटला असून हातकणंगले बांधकाम विभागाकडून कार्यारंभ आदेशही निघाला आहे.तथापि अपुऱ्या जागेच्या कारणास्तव मूळ ठिकाणी इमारत बांधकामास वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांनी विरोध केल्याने आता नवीन ठिकाणी जागा मिळवून ग्रामसचिवालय उभारण्यास कालावधी लागण्याची शक्यता आहे.
कन्या शाळेसमोर असलेली ग्रामपंचायतीची जुनी इमारत मोडकळीस आल्याने वर्षापूर्वी पाडण्यात आली.जुन्या इमारतीचे निर्लेखन करुन त्याजागी नवीन इमारत बांधकामास ना हरकत तसेच निधी मिळविण्यासाठी ग्रामपंचायतीची आजवर दमछाक झाली आहे.विविध मार्गांनी बांधकामासाठी ७८ लाख रूपयांची तरतूद करून मूळच्या ठिकाणी ग्रामसचिवालय इमारत बांधकामास काही दिवसांत सुरुवात करण्याच्या हालचाली सुरू होत्या.
दरम्यान, गावचा वाढता विस्तार लक्षात घेता ग्रामसचिवालय अपुऱ्या जागेत न बांधता ते प्राथमिक आरोग्य पथकाच्या आवारात अथवा केंद्रशाळेमागील मोकळ्या जागेत बांधावे अन्यथा मूळ ठिकाणी इमारत बांधण्यास विरोध करण्याचा पवित्रा अरुण पाटील यांनी घेतल्याने ग्रामपंचायतीसमोर पेच निर्माण झाला आहे. एकतर सामंजस्याने मार्ग काढणे अथवा पूर्वनियोजित जागी ग्रामसचिवालय उभारणे यावर एकमत घडविण्यासाठी ग्रामपंचायतीची कसोटी लागणार आहे.
.......
कोट-
नागरिकांच्या सोयीसाठी ग्रामसचिवालयाची इमारत प्रशस्त जागेत असणे गरजेचे आहे.मूळची जागा अपुरी असल्याने या जागी इमारत बांधकामास आपला विरोध असून यासाठी आरोग्य पथकाची अथवा अन्यत्र जागा मिळविण्यासाठी आपण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करू.
-अरुण पाटील, संचालक वारणा दूध संघ.
कोट
शासन निर्णयाप्रमाणे ग्रामसचिवालय बांधण्यासाठी एक जागा उपलब्ध असताना दुसरी जागा मिळत नसल्याने पूर्वीच्या ठिकाणीच ग्रामसचिवालय बांधण्याचा निर्णय झाला आहे. तथापि गावहिताचा विचार करून
प्राप्त परिस्थितीतून सामंजस्याने मार्ग काढू.
माधुरी घोदे, सरपंच ग्रामपंचायत कुंभोज