Kolhapur Municipal Election 2026: पैशाची फोडणी... सहा महिन्यांपासून जोडणी; निधी संकलनावर जोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 18:21 IST2025-12-18T18:20:14+5:302025-12-18T18:21:40+5:30
इच्छुकांचे पक्षाच्या मदतीकडे लक्ष

Kolhapur Municipal Election 2026: पैशाची फोडणी... सहा महिन्यांपासून जोडणी; निधी संकलनावर जोर
कोल्हापूर : केलेली विकासकामे, सांगण्यात येणारे जाहीरनामे, राज्य, केंद्रातील नेत्यांची भाषणे या सगळ्याच्या जोडीला जर ‘कॅश’ नसेल तर निवडणुकीमध्ये अनेकदा जिंकण्यावर मर्यादा येतात हे याआधी अनेकवेळा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे खरोखरच ज्यांनी कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीसाठी उतरण्याचे ठरवलेच होते, त्यांनी गेल्या सहा महिन्यांपासूनच आर्थिक रसद पुरवठा कसा सुरू राहील, याची दक्षता घेतल्याचे जाणवते.
या निवडणुकीदरम्यान वित्त पुरवठा हा प्रचंड महत्त्वाचा घटक असल्यामुळे ऐनवेळी अनेकदा काही गोष्टी शक्य होत नाहीत. म्हणूनच सहा, सात महिन्यांपासून जोडण्या घालण्याच्या कामात अनेकजण होते. या निवडणुकीची मुख्य प्रक्रिया सुरू होण्याआधी वित्त पुरवठ्याबाबत काही प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर अनेक गोष्टी पुढे आल्या.
आपल्या नोकरी, व्यवसायामधून मिळालेल्या पैशांतून ज्यांनी प्लॉट, फ्लॅट गुंतवणूक म्हणून घेतले होते, त्यातील काहींनी सहा, सात महिन्यांपूर्वीच यातील काहींची विक्री करून पैसे तयार ठेवले आहेत. इतरांना मदत करण्यापेक्षा आपण किंवा आपल्या घरातील कोणाला तरी महापालिकेत पाठवण्यासाठी ठेकेदार, इस्टेट एजंट, दोन नंबरचा व्यवसाय करणारे अशा अनेकांनी ‘टाईट फिल्डिंग’ लावली आहे. गेल्या काही वर्षांत तरुण मंडळे, उत्सव देणग्या, महाप्रसाद या माध्यमातून केेलेली गुंतवणूक आता कामी येईल, असा अनेकांना आशावाद आहे.
काहींनी आपली बचत रक्कम सुरुवातीच्या टप्प्यात बाहेर न काढण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल एक अनुभवी इच्छुक म्हणाला, ‘गेल्यावेळी पहिल्यांदाच पैसे खर्च करायला बाहेर काढले आणि जाहीर प्रचारानंतरच्या गुप्त प्रचारात मी मागे पडलो. त्यामुळे यावेळी माझी शिल्लक शेवटच्या दोन दिवसांसाठी ठेवणार आहे.’
मित्र परिवारासह, सासूरवाडीकडूनही मदत
काहींचा मित्रपरिवार एवढा घट्ट आहे की लाख, दोन लाखांची वर्गणी काढून मित्राच्या निवडणुकीसाठी निधीची उभारणी करण्यात आली आहे. तर काहींना सासूरवाडीकडूनही मदत झाल्याची अपवादात्मक उदाहरणे या दरम्यान ऐकायला मिळाली आहेत.
पक्षाच्या मदतीकडे लक्ष
या निवडणुकीत कोल्हापूर असो वा इचलकरंजी, महायुतीच्या उमेदवारांना पक्षाकडून जोरदार ‘टॉनिक’ मिळणार आहे. शिंदेसेना, भाजप आणि राष्ट्रवादीही याबाबतीत तोडीस तोड असल्याने आधी पक्षाकडून काही शब्द मिळतो का? याची चाचपणी तगड्या इच्छुकांकडून सुरू आहे. तर काॅंग्रेसला मात्र याबाबत मर्यादा आहेत. तरीही कोल्हापुरात आमदार सतेज पाटील यामध्येही खंबीर पाठबळ देतील, असा विश्वास महाविकास आघाडीच्या इच्छुकांना आहे.