अंतर्गत कुरघोड्यानेच कॉँग्रेस हद्दपार

By Admin | Updated: October 22, 2014 00:23 IST2014-10-22T00:09:48+5:302014-10-22T00:23:30+5:30

राजकारण अंगलट : त्याच-त्याच उमेदवारांनाही कंटाळले मतदार

Congressional expulsion by internal combustion | अंतर्गत कुरघोड्यानेच कॉँग्रेस हद्दपार

अंतर्गत कुरघोड्यानेच कॉँग्रेस हद्दपार

विश्वास पाटील -  --कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा जिंकता न आल्याने नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले. परंतु, त्याचा खोलात जाऊन विचार केल्यास काँग्रेसनेच काँग्रेसचा पराभव केल्याचे चित्र स्पष्टपणे दिसते.  राष्ट्रवादीच्या विरोधातला प्रचार जास्त विखारी असताना व जनतेतही नाराजीची तीव्र भावना असताना या पक्षाने दोन जागा राखल्या. विनय कोरे यांना पराभूत करून लोकांनी त्यांनी वारणा समूहाच्या विकासात योगदान द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. याउलट शिवसेनेने काँग्रेसमधीलच नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी देऊन जिल्ह्यावरील मांड भक्कम केली. भाजपला ‘कोल्हापूर दक्षिण’च्या जागेचा फायदा झाला असून, त्यांचे आता दोन आमदार झाले.
काँग्रेसमध्ये पी. एन. पाटील व सतेज पाटील यांची तोंडे दोन दिशेला होती. हातकणंगलेत जयवंतराव आवळेंना पुन्हा रिंगणात का आणले, हे न सुटणारे कोडेच म्हटले पाहिजे. इचलकरंजीत आवाडे कुटुंबीयांबद्दलचा राजकारणाचा राग अजूनही दूर झाला नसल्याचा फटका त्यांना बसला. भरमू पाटील अजून किती वर्षे निवडणुका लढवणार, अशी स्थिती होती. सा. रे. पाटील यांनी ज्येष्ठ आमदार म्हणून चांगली प्रतिमा निर्माण केली असली तरी त्यांनाच कितीवेळा संधी द्यायची, याचाही विचार पक्षाने केला नाही. असले शिलेदार घेऊन काँग्रेस निवडणुकीला सामोरे गेल्यावर पदरी पराभवच येणार होता, घडलेही तसेच. पक्षाबद्दल नकारात्मक वातावरण असल्याने जास्त दक्ष राहायला हवे होते. परंतु, त्याची झळच कुणी लक्षात घेतली नाही.
राधानगरी मतदारसंघात के. पी. पाटील यांचा पराभव करायचा म्हणून लोकांनी निवडणूक हातात घेतली, तर करवीरमध्ये ती पी. एन. पाटील यांना निवडून आणायचे म्हणून. तरीही पी. एन. यांचा निसटता पराभव झाला. कारण एका मर्यादेच्या पलीकडे जाऊन त्यांना लोकांशी एकरूप होता आले नाही. पन्हाळा व गगनबावड्याने त्यांना दगा दिला. तो भाग हाताला लागणार नाही, हे माहीत असूनही तिथे जे बेरजेचे राजकारण व्हायला हवे होते, ते त्यांच्याकडून झाले नाही. राधानगरीत राष्ट्रवादीला धडा शिकवायच्या नादात करवीरमधील राष्ट्रवादीने त्यांना धडा शिकवला.
राष्ट्रवादीने तीनपैकी दोन जागा जिंकल्या असल्या तरी त्यात पक्षापेक्षा त्या-त्या उमेदवाराची प्रतिमा जास्त फायदेशीर ठरली. निवडणुकीच्या राजकारणात विजयासाठी अनेक ‘जोडण्या’ कराव्या लागतात. त्या करण्यात मुश्रीफ यांचा हात कुणीच धरू शकणार नाही. त्या बळावर ते विजयी झाले. चंदगडला संध्यादेवी कुपेकर दुसऱ्यांदा आमदार होण्यात त्यांच्याबद्दलची सहानुभूती कारणीभूत ठरलीच, शिवाय त्या निवडून आल्या तर कुणाला उपद्रव करणार नाहीत, ही देखील राजकीय सुरक्षिततेची भावनाही तितकीच महत्त्वाची ठरली.
जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक विनय कोरे यांच्या पक्षाला व राजकारणालाही लोकांनी दहा वर्षांत लाथाडले. स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांनी वारणा समूहासाठी राजकारणावर पाणी सोडले. परंतु, विनय कोरे यांनी राजकारणासाठी या संस्थाच पणाला लावल्यावर लोकांना ते आवडले नाही. कोरे यांनी मदत केली म्हणून कागलमध्ये मुश्रीफ विजयी झाले. करवीरमध्ये काँग्रेसचा पराभव केला व शाहूवाडीत स्वत:चा. अशा या सगळ्या गंमती-जमती झाल्या आहेत.

महाडिक यांंची तिन्ही बोटे तुपात...
आमदार महादेवराव महाडिक यांची मात्र या निवडणुकीनंतर तिन्ही बोटे तुपात आहेत. मुलगा अमल आमदार झाल्याने ‘गोकुळ’सह राजाराम कारखाना व जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही महाडिक गटाचा दबदबा राहणार, हे स्पष्टच आहे.

Web Title: Congressional expulsion by internal combustion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.