कोल्हापूर : लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या हक्काची जागा काँग्रेसला सोडून शाहू छत्रपती यांना मोठ्या फरकाने विजयी केले. पण, विधानसभेला आमच्या विरोधात काम केले. काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाचे तर ‘कागल’ मतदारसंघात हेलिकॉप्टर उतरलेच नाही, प्रत्येक वेळेला प्रामाणिक फक्त आम्हीच वागायचे का? अशी विचारणा राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बुधवारी झालेल्या मेळाव्यात करण्यात आली. जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील अध्यक्षस्थानी होते. सर्वच पदाधिकाऱ्यांनी आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली.जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवानंद माळी म्हणाले, समरजीत घाटगे यांचा पराभव अशक्य होता, पण काँग्रेसने मदत केली नाही. याबद्दल काँग्रेसच्या प्रमुख नेतृत्वाला विचारणा होणार आहे की नाही. शिवाजीराव खोत म्हणाले, काँग्रेसने प्रामाणिक मदत केली असती तर ‘चंदगड’, ‘कागल’मध्ये आमचे आमदार असते. हसन मुश्रीफ यांनी गडहिंग्लज कारखाना, बाजार समिती, संघ संपवला. यापुढच्या काळात त्यांना गडहिंग्लजमध्येच राेखले जाईल.
शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे म्हणाले, पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या भावना योग्य आहेत. त्यांनी जे भोगले तेच ते बोलत आहेत. पण, आता मागील काढत बसण्यापेक्षा पक्ष मजबुतीसाठी आराखडा तयार करूया. तालुक्यात जाऊन कार्यकर्त्यांना ताकद देऊया.जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील म्हणाले, पक्षाच्या नेतृत्वाबाबत अफवा पसरवत असल्याने कार्यकर्त्यांत अस्वस्थता आहे. आम्ही स्वाभिमानी आहे, कोणाच्या दारात भीक मागायला जाणार नाही, हे पक्षनेतृत्वाची भेट घेऊन सांगणार आहे. काँग्रेसने विधानसभेला मदत केली नाही, हे खरे असले तरी त्यांचेही मोठे नुकसान झाले. आता मागील काढत बसायचे नाही, काँग्रेससोबतच पुढे जायचे आहे.शहराध्यक्ष आर. के. पोवार म्हणाले, सत्तेसाठी आम्ही काम करणारे कार्यकर्ते नाही, शरद पवार यांच्या विचारावर श्रद्धा ठेवून लढतोय. कार्यकर्त्यांना नाउमेद न होता, पक्ष बळकटीसाठी ताकदीने कामाला लागा.धनाजीराव पर्वते, धनराज चव्हाण, बी. के. चव्हाण, विठ्ठल जगदाळे, श्रीकांत पाटील, अश्विनी माने, फिरोज बागवान, जयकुमार शिंदे, स्नेहा देसाई, शर्मिला सावंत, पद्मा तिवले, अमर चव्हाण, बी. के. डोंगळे, रोहित पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. बाजीराव खाडे, मुकुंद देसाई, रावसाहेब भिलवडे, अनिल घाटगे, सुनील देसाई आदी उपस्थित होते.
कागल गांजाचे हब..पैसे देऊन विधानसभेला मताधिक्य कमी केल्याची वल्गना हसन मुश्रीफ करत आहे, हा मोठा विनोद असून कागलातील यशवंत किल्ल्यामध्ये अवैध धंदे सुरू आहेत. मंत्र्यांचे कागल गांजाचे हब बनत असल्याचा आरोप शिवानंद माळी यांनी केला.
ऐक्याची संभ्रमावस्था दूर करादोन्ही राष्ट्रवादी एक होणार असल्याच्या चर्चा आहेत, ही संभ्रमावस्था पहिल्यांदा दूर करा. असे होणार असेल तर आपल्यावर कोणी विश्वास ठेवणार नसल्याचे ‘गोकुळ’चे संचालक रामराज कुपेकर यांनी सांगितले.