महापालिका, लोकप्रतिनिधींमुळेच गांधी मैदानाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:23 IST2021-05-12T04:23:22+5:302021-05-12T04:23:22+5:30
कोल्हापूर : शिवाजी पेठेतील ज्या मैदानाने कोल्हापूच्या फुटबॉल परंपरेला अनेक नामांकित खेळाडू दिले, देशभरातील अनेक विचारवंत, नामवंत वक्ते, राजकारणी ...

महापालिका, लोकप्रतिनिधींमुळेच गांधी मैदानाची दुरवस्था
कोल्हापूर : शिवाजी पेठेतील ज्या मैदानाने कोल्हापूच्या फुटबॉल परंपरेला अनेक नामांकित खेळाडू दिले, देशभरातील अनेक विचारवंत, नामवंत वक्ते, राजकारणी यांच्या सभा गाजल्या, त्या ऐतिहासिक गांधी मैदानाची आज प्रचंड दुरवस्था बनली आहे. महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे गांधी मैदान म्हणजे मद्यपींचा अड्डा, नशेबाजांचे लोळण्याचे ठिकाण आणि सांडपाणी, चिखलात माखलेले दलदलीचे ठिकाण बनले आहे.
शिवाजी पेठेतील अनेक नामवंत फुटबॉल खेळाडून गांधी मैदानावर तयार झाले. याच मैदानावर ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, राजीव गांधी, शरद पवार, काशीराम, प्रा. एन. डी. पाटील यांच्या सभा याच मैदानावर गाजल्या. महागाईविरोधी निघालेले ऐतिहासिक मोर्चे असोत, की महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरील आंदोलन असो, याच मैदानावरून त्याचे रणशिंग फुंकले गेले. विश्वशांती यज्ञाविरुध्दचे आंदोलन याच मैदानावर झाले. अशा अनेक घटनांचे साक्षीदार असलेल्या या गांधी मैदानाकडे पाहण्याचा महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधींचा कमालीचा उदासीन दृष्टिकोन या मैदानाच्या दुरवस्थेला कारणीभूत ठरला आहे. त्यामुळे संपूर्ण शिवाजी पेठेतून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मागच्या आठवड्यात पडलेल्या वळवाच्या पावसाने या मैदानावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले असून आजही पाणी आणि चिखल याची मोठी दलदल निर्माण झाली आहे. पाण्यात कचरा कुजला असून पाणी काळे पडले आहे. त्यावर माशा, कीटक घोंगावत आहेत. दुर्गंधी सुटली आहे. आसपासच्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मैदानातील पाणी वाहून जाण्याची व्यवस्था नसल्याने पावसाचे पाणी साचून राहते. मैदानावरील माती वाहून जाते. मैदानाचा थोडा भाग वगळता, अन्य सर्व मैदान चिखल, कचरा, प्लास्टिकने व्यापून गेले आहे. त्यामुळे पहाटेच्यावेळी फिरायला येणाऱ्या नागरिकांनी मैदानाकडे पाठ फिरविली आहे.
- मद्यपींचा अड्डा अन् बाटल्यांचा खच
ऐतिहासिक परंपरा असलेले गांधी मैदान म्हणजे मद्यपींचा अड्डा बनला आहे, गांज्या ओढणाऱ्या नशेबाजांचे लाेळण्याचे ठिकाण बनले आहे. मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता ‘लोकमत’ प्रतिनिधींनी भेट दिली, त्यावेळी जनता बझार इमारतीकडील बाजूला पंधरा ते वीस व्यक्ती खुलेआम मद्यपान करत होत्या. काही जण गांज्या ओढत नशेत होते. महापालिकेचे कर्मचारी मद्याच्या बाटल्या, प्लास्टिकचे ग्लास, पाण्याच्या बाटल्या गोळा करत होते. सोमवारी अर्धी ट्रॉली भरून मद्याच्या बाटल्या उचलल्याचे येथील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सांगितले.
- कबड्डी मैदान घालविले, टर्फ मैदान सुरू
गांधी मैदानाला लागून १९९३ साली ताराराणी स्पोर्टस् क्लबला कबड्डीच्या प्रसारासाठी महानगरपालिकेने जागा दिली होती. रमेश भेंडेगिरी व उमा भेंडेगिरी या ध्येयवेड्या खेळाडूंनी तेथे दोन वर्षापूर्वीपर्यंत मुलींसाठी सरावाकरिता मैदान चालविले होते. या मैदानावर ५० ते ६० मुली राष्ट्रीय कबड्डीपट्टू म्हणून गाजल्या. तीन वेळा शिवछत्रपती पुरस्कार मिळाले. कोल्हापूरचा नावलौकिक वाढविला. अशा या मैदानावर गावगुंडांनी असभ्य वर्तन करून रोज मुलींना त्रास देणे सुरू केले. याबाबत समजावून झाले, बैठका झाल्या. पण त्रास काही बंद झाला नाही. शेवटी ही जागा संघटनेने सोडून दिली. तेथे आता फुटबॉल टर्फ मैदान करण्यात आले आहे.