सवलतींचे स्वागत, मात्र जीआरमध्ये मेख मारू नका : चंद्रकांत पाटील यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 18:44 IST2020-09-23T18:40:47+5:302020-09-23T18:44:35+5:30
मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आरक्षणावरील स्थगिती उठविण्याची लढाई राज्य सरकारने लढली पाहिजे. आरक्षण मिळेपर्यंत या समाजाला जाहीर केलेल्या सवलतींचे मी स्वागत करतो, परंतु त्याची अंमलबजावणी करताना जीआरमध्ये मेख मारू नका म्हणजे झाले, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत लगावला.

सवलतींचे स्वागत, मात्र जीआरमध्ये मेख मारू नका : चंद्रकांत पाटील यांची टीका
कोल्हापूर : मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आरक्षणावरील स्थगिती उठविण्याची लढाई राज्य सरकारने लढली पाहिजे. आरक्षण मिळेपर्यंत या समाजाला जाहीर केलेल्या सवलतींचे मी स्वागत करतो, परंतु त्याची अंमलबजावणी करताना जीआरमध्ये मेख मारू नका म्हणजे झाले, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत लगावला.
प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, जे ओबीसींना ते मराठ्यांना याप्रमाणे भाजपने आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ज्या सुविधा दिल्या होत्या, त्या सुविधा, तरी महाविकास आघाडीच्या सरकारने लगेच सुरू कराव्यात. त्यात ६४२ अभ्यासक्रमांचे शुल्क हे सरकारने भरावे. १० लाखांवरील कर्जाचे व्याज आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने भरावे.
सारथीला आर्थिक बळ द्यावे. आता मराठा समाजाचे जातीचे आरक्षण स्थगित झाल्याने आर्थिक आरक्षणात अर्ज करण्यासाठी या समाजाला परवानगी मिळावी, अशी आम्ही केलेली मागणी मंत्रिमंडळाने मान्य केली. मात्र, ज्या सवलती दिल्या आहेत. त्यांची अंमलबजावणी सरकारने काटेकोरपणे करावी. नोकरशाही त्यामध्ये अडथळे आणणार नाही हे एक-दोन मंत्र्यांनी या सवलतींचे जीआर निघेपर्यंत पाहावे.
नाथाभाऊ तर आमचेच हो..
माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याबाबतीत अनेक वेळा अफवा निर्माण होतात. नाथाभाऊ हे आमचे जुने, जाणते आणि ज्येष्ठ नेते आहेत. ते कधीही भाजपला नुकसान होईल असा निर्णय घेणार नाहीत, असे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले.