Kolhapur: वन्यप्राण्यांमुळे नुकसानीचे पंचनामे वेळेत करा, अन्यथा कारवाई; पालकमंत्र्यांनी दिल्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 16:37 IST2025-10-29T16:36:40+5:302025-10-29T16:37:24+5:30
वाहनांच्या नुकसानीचीही मिळणार भरपाई

Kolhapur: वन्यप्राण्यांमुळे नुकसानीचे पंचनामे वेळेत करा, अन्यथा कारवाई; पालकमंत्र्यांनी दिल्या सूचना
कोल्हापूर : वन्यप्राण्यांनी केलेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत न करणाऱ्या व नागरिकांना सहकार्य न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. एकाच भागात वारंवार शेतकऱ्यांचे नुकसान होत असेल तर संपूर्ण शेतीक्षेत्राचा विचार करून नुकसानभरपाई निश्चित करा, वन्यप्राण्यांमुळे वाहनांचे नुकसानही मदतीच्या कक्षेत आणा असेही पालकमंत्र्यांनी सुचवले.
आजरा तालुक्यातील आणि आसपासच्या गावांमध्ये हत्तींसह इतर वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी पालकमंत्री आबिटकर यांना निवेदन देत भरपाई मिळावी आणि वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांवर नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली होती.
या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृह येथे वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, संबंधित अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उपवनसंरक्षक पाटील यांनी विशेष बाब म्हणून पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य प्रकारे भरपाई देण्याबाबत कार्यवाही करणार असल्याचे सांगितले.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले, शासन निर्णयानुसार पंचनामे व नुकसानभरपाई ठरवावी, पंचनामे एकदाच न करता वास्तविक नुकसानाचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन व्हावे. वन्यप्राणी दिसल्यानंतर तातडीने संरक्षण दल घटनास्थळी पोहोचेल, यासाठी यंत्रणा तत्पर ठेवा, एकाच भागात वारंवार प्राण्यांची हालचाल होत असल्यास त्यांना अन्य भागात हलविण्याचे प्रयत्न करा. आठ दिवसांत वनहक्क दावे मार्गी लावण्यासाठी तालुक्यात वनविभाग, महसूल विभाग व ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक घेऊन सर्व प्रश्न तातडीने सोडवले जाणार आहेत.