अकरावी ‘विज्ञान’साठीच तक्रारी
By Admin | Updated: July 10, 2014 23:59 IST2014-07-10T23:57:44+5:302014-07-10T23:59:19+5:30
विद्यार्थी, पालकांची गर्दी : पहिल्याच दिवशी १३०० जणांचे प्रवेश निश्चित

अकरावी ‘विज्ञान’साठीच तक्रारी
कोल्हापूर : अकरावीच्या प्रत्यक्ष प्रवेशाला आज, गुरुवारपासून सुरुवात झाली. त्यात पहिल्याच दिवशी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेसाठी १ हजार ३०२ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी प्रवेश निश्चित केला. केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीच्या तक्रार निवारण केंद्रांवर विविध स्वरूपातील एकूण ११४ तक्रारी दाखल झाल्या. यात विज्ञानच्या १०२, वाणिज्यच्या १२ तक्रारींचा समावेश होता. कला शाखेतून एकही तक्रार झाली नाही. प्राप्त झालेल्या तक्रारींमधील ३१ मान्य, तर ८२ तक्रारी अमान्य केल्या.
प्रवेश प्रक्रिया समितीने काल, बुधवारी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली. त्यानंतर निवड यादीनुसार मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित करण्यासाठी आज विद्यार्थी-विद्यार्थिनींनी संबंधित महाविद्यालयात गर्दी केली. प्राधान्यक्रम दिलेले, पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनी उत्साहात प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली, तर नको असलेले महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसमवेत तक्रार निवारण केंद्रे गाठली. समितीने नियुक्त केलेल्या तिन्ही शाखांच्या तक्रार केंद्रांवर ११४ तक्रारी दाखल झाल्या. त्यात कॉलेज लांब आहे, प्रवेश शुल्क जादा आहे, कॉलेजसाठी शहराबाहेरून यावे लागते अशा विविध स्वरूपांतील तक्रारींचा समावेश होता. कमला कॉलेजला प्रवेश मिळाल्याची काही विद्यार्थ्यांच्या तक्रारी होत्या. त्यांना महाविद्यालय बदलून देण्यात आले. दिवसभरात विविध महाविद्यालयांत १ हजार ३०२ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी प्रवेश निश्चित केला. त्यात विज्ञान शाखेच्या ६६३, वाणिज्यच्या ४६८ आणि कलाच्या १७१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची अंतिम मुदत दि. १४ जुलैपर्यंत आहे. (प्रतिनिधी)