'Communication' banned on banned paper | गांभीर्यच नाही : बंदी कागदावर ‘संचार’ गावभर--भाजी, औषधे खरेदीचा बहाणा

गांभीर्यच नाही : बंदी कागदावर ‘संचार’ गावभर--भाजी, औषधे खरेदीचा बहाणा

ठळक मुद्देविनाकारण फिरणाऱ्यांचीही संख्या वाढलेली आहे. त्यांना मात्र मज्जाव करण्याची आवश्यकता आहे.

कोल्हापूर : राज्य सरकारची संचारबंदी, केंद्र सरकारचा लॉकडाऊन असूनही काही बेजबाबदार नागरिक भाजी, औषधे, दूध आणण्याच्या बहाण्याने रस्त्यावर मुक्त संचार करीत असल्याचे मंगळवारी दिसून आले. शहराच्या बहुतेक सर्वच रस्त्यांवर असे चित्र होते. त्यात दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनांचाही मोठ्या प्रमाणात वावर होता. पोलिसांनीही घरात बसण्याची सक्ती थोडी शिथिल केल्याचा हा परिणाम होता.

राज्य सरकारने संचारबंदीची मुदत बुधवार (दि. २५)पासून १४ एप्रिलपर्यंत वाढविली आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांत ज्या प्रकारे शहरवासीयांनी जिल्हा व पोलीस प्रशासनाला सहकार्य केले, तसेच येथून पुढेही करणे अपेक्षित आहे. त्यामुळे आवश्यक कारणासाठीच घराबाहेर पडायचे आहे. विनाकारण शहरात फेरफटका मारणाऱ्या वाहनधारकांवर पोलीस कारवाई करणार आहेत.
कोल्हापुरात सध्यातरी कोरोना संसर्गाबाबत मोठे चिंतेचे कारण नसले तरी ३० मार्चपासून समूह संसर्गाची प्रकरणे समोर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी आणखी १४ दिवस स्वत:ला बंदिस्त करून घेणे आवश्यक आहे. तरीही मंगळवारचे चित्र वेगळेच होते.

शहरात भाजी विक्रीची, तसेच औषध खरेदीची सोय असल्याचा गैरफायदा घेत अनेक नागरिक रस्त्यावर आल्याचे पाहायला मिळाले. सकाळी फिरायला, सायकलिंग करायला जाणारे सुशिक्षित नागरिकही स्वत:च्या जिवाशी खेळताना दिसून आले. ‘फिरल्यानं काय होतंय’ ही मानसिकता त्यांना अडचणीत आणू शकते. पोलिसांनी अशा नागरिकांना फटकारले आणि घरी जाण्याचा सल्ला दिला.
सकाळी फिरायला गेलेल्या, तसेच सायकलिंग करणा-या नागरिकांना त्यांची नावे, काय करतात, कोठे राहता हे विचारून त्यांचे उपहासात्मक व्हिडिओ तयार करून व्हायरल करण्याचा एक नवा फंडा पोलिसांनी स्वीकारला आहे. काही पोलीस बेजबाबदार वाहनधारकांना हात जोडून विनंती करीत आहेत, तर काही पोलीस वाहने अडवून ती जप्त करीत आहेत.

जवळपास ८० टक्के शहर लॉकडाऊन आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, पोलीस, शासकीय, महानगरपालिका, महावितरण, पाणीपुरवठा कर्मचारी, काही स्वयंसेवक रस्त्यांवर फिरताना दिसतात. विनाकारण फिरणाऱ्यांचीही संख्या वाढलेली आहे. त्यांना मात्र मज्जाव करण्याची आवश्यकता आहे.


‘संचारबंदी’चा भंग केल्यास अशी शिक्षा
१‘कोरोना विषाणू’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या संचारबंदीचा भंग करणाऱ्यांना आता विविध कलमान्वये वेगवेगळ्या शिक्षेस सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आता विनाकारण बाहेर पडणाऱ्यांनो विचार करा. अन्यथा पुढील वर्षभर न्यायालयाचे खेटे व शिक्षेला सामोरे जावे लागेल.

२संचारबंदीच्या काळात विनाकारण शहरातून फेरफटका मारणाºयांना प्रथम पोलिसांनी विनंती करून फिरू नये, असे सांगितले. तरीसुद्धा अनेकजण रस्त्यावरून फिरत आहेत. यानंतर शारीरिक शिक्षा म्हणून ऊठा-बशा काढण्याची शिक्षा सुनावली. त्यानंतरही ही मंडळी ऐकण्याचे नाव घेईनात. त्यानंतर पोलिसांनी थेट वाहनेच जप्त करण्यास व गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली. तरीसुद्धा ऐकण्याचे नाव घेईनात.

३आता थेट पोलिसांनी अशा उनाड फिरणाºयांवर गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली आहे. भा.द.वि. २७१,२९०, ५०५(२) तसेच कलम ५१ ब ५२, ५४, ३७(३),कलम २, ३, ४ अशा विविध दखलपात्र व अदखलपात्र कलमाखाली १ महिन्यांपासून ते ३ वर्षापर्यंत शिक्षा व दंड होवू शकतो. तसेच कोविड-१९ उपाययोजना नियम २०२० नियम ११- रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनावश्यक वाहने फिरणाºयांवर गुन्हे व वाहने जप्त व ती ताब्यात घेण्याचे अधिकार दिले आहेत.

Web Title: 'Communication' banned on banned paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.