जिल्हाधिकारी कार्यालय अजूनही अंधारातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:25 IST2021-07-30T04:25:44+5:302021-07-30T04:25:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महापुरामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी आल्याने येथील दैनंदिन कामकाज तसेच महसूलचे काम ठप्प झाले आहे. ...

जिल्हाधिकारी कार्यालय अजूनही अंधारातच
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महापुरामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी आल्याने येथील दैनंदिन कामकाज तसेच महसूलचे काम ठप्प झाले आहे. सध्या सर्वच कर्मचाऱ्यांना महापुराच्याच वेगवगेवळ्या कामांची जबाबदारी दिली आहे. सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालय सुरू होण्याची शक्यता आहे, मात्र पुनश्च हरिओम करत पुढील काही दिवस दप्तर लावणे, विद्युत यंत्रणा, नेट कनेक्शन, संगणकाची जोडणी आणि कागदपत्रांची जुळवाजुळव यातच जाणार आहेत.
महापुरामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या इमारतीत पाच फुटांच्यावर पाणी आले होते. तर मागे जिल्हाधिकारी बसतात त्या दालनांमध्ये दोन फुटांवर पाणी होते. हे पाणी ओसरल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाची स्वच्छता सुरू आहे. आधी नव्या इमारतीची आणि सध्या जुन्या इमारतीची साफसफाई केली जात आहे. जमीन, गावठाण, गृह, आस्थापना आणि नागपूर विभाग येथे कार्यरत आहेत. सध्या जिल्हा परिषदेतून जिल्हाधिकारी राहुल रेखावार व निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे हे कामकाज पाहत आहेत. आपत्ती व्यवस्थापनचे कार्यालयदेखील तेथेच हलवण्यात आले आहे. अन्य विभागातील काही कर्मचारी जिल्हा परिषदेत तर ज्यांचे विभाग जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर आहेत ते कर्मचारी आपापल्या ठिकाणी येऊन काम करत आहेत. पण अजूनही येथे लाईट नसल्याने संगणकावर काम करता येत नाही. शिवाय सध्या सर्व कर्मचाऱ्यांकडे महापुराचीच जबाबदारी सोपण्यात आली आहे. पुराची आकडेवारी, स्थलांतरित लोक, बाधित कुटुंब, नुकसानीचे पंचनामे, पूरग्रस्तांना मदत अशी कामे विभागून केली जात आहेत. यामुळे महसूलचे काम मात्र ठप्प झाले आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय पूर्ववत सुरू होईल, मात्र पुनश्च हरिओम करत दप्तर लावण्यापासून यंत्रणा पूर्ववत होईपर्यंत आणखी काही दिवस जाणार आहेत.
---
फोटो नं २९०७२०२१-कोल-कलेक्टर ऑफीस०१,०२
ओळ : महापुरामुळे पाण्याखाली गेलेल्या कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या इमारतीची सध्या वेगाने स्वच्छता सुरू आहे.
---