कोसळणाऱ्या इमारती... आरडाओरडा
By Admin | Updated: May 1, 2015 00:14 IST2015-04-30T23:42:06+5:302015-05-01T00:14:57+5:30
नेपाळमध्ये गलाई बांधवांनी अनुभवला थरार : नातेवाईकांच्या डोळ्यात आनंदाश्रू --लोकमत विशेष

कोसळणाऱ्या इमारती... आरडाओरडा
दिलीप मोहिते - विटा -शनिवार असल्याने मार्केट बंद... मुलांच्या शाळांनाही सुट्टी... त्यामुळे घराच्या तिसऱ्या मजल्यावर दैनंदिन कामे आटोपत असताना अचानक जमीन हलू लागली... काही कळायच्या आत संपूर्ण इमारत थरथरू लागली. भूकंप असल्याचे लक्षात आल्याने घरातील वडील, पत्नी, दोन मुले व मी दरवाजाच्या चौकटीखाली येऊन उभे राहिलो. काही वेळाने इमारत थरथरणे बंद झाले. घाई गडबडीतच आम्ही सर्वजण व पहिल्या मजल्यावरील आमचे कामगार रस्त्यावर येऊन थांबलो. त्याचवेळी दरबार स्क्वॉईल परिसरात जुन्या इमारती धडाधड कोसळू लागल्या. आरडाओरडा, मोठा आवाज, त्यातच पत्त्याप्रमाणे कोसळणाऱ्या इमारतींचा धुरळा पाहून डोळ्यासमोरही साक्षात मृत्यू दिसू लागला... पोपट चव्हाण सांगत होते...
नेपाळच्या काठमांडू शहरात सोने-चांदी गलाई व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले आटपाडी तालुक्यातील यमाजी पाटलाचीवाडी येथील पोपट नारायण चव्हाण भूकंपावेळचा थरारक अनुभव सांगत होते. शनिवारी काठमांडूत झालेल्या भूकंपात पोपट चव्हाण, त्यांचे वडील नारायण, पत्नी सौ. रूपाली, मुलगा करण व मुलगी हर्षदा आणि भाचे दीपक खंडागळे, हर्षवर्धन पवार, तात्यासाहेब गिड्डे व सुहास फडतरे आदींसह अन्य गलाई बांधव अडकून पडले होते. हे सर्व कुटुंब गुरुवारी सकाळी गावी सुखरूप दाखल झाले. त्यावेळी आतुरतेने वाट पाहणाऱ्या चव्हाण यांच्या भगिनी सरस्वती पवार, सखूबाई गिड्डे, भाऊ शिवाजी, पुतण्या सुनील यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. गाडीतून उतरताच या सर्वांनी त्यांना कडकडीत मिठी मारून औक्षण केले आणि सर्वांच्याच डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
चव्हाण कुटुंबियांच्या चेहऱ्यावरचे भय अजूनही संपलेले नाही. ते म्हणाले, भूकंप झाला त्यावेळी आम्ही सर्वजण घरातच होतो. इमारत धडधडू लागल्याने भयभीत होऊन दरवाजाच्या चौकटीखाली येऊन उभे राहिलो. तरीही आवाज व इमारतीचे हलणे बंद झाले नव्हते. अखेर वीस मिनिटांनी भूकंपाची तीव्रता कमी झाली. मुलांना व पहिल्या मजल्यावर असलेल्या कामगार आणि इतर नातेवाईकांना घेऊन रस्त्यावर येऊन थांबलो.
त्याचवेळी आमच्यापासून काही अंतरावर असलेल्या दरबार स्क्वॉईल परिसरात इमारती धडाधड कोसळू लागल्या. मोठ्या प्रमाणात धुरळा व आवाज येऊ लागल्याने सर्वजण भयभीत झालो. त्यावेळी दुचाकी व रुग्णवाहिकेतून जखमींना आणण्यात येत होते. रुग्णालयात जागाच नसल्याने रस्त्यावरही जखमींवर उपचार करण्याचे काम चालू होते. भूकंप बंद झाल्यानंतर पुन्हा घरात जाण्यास निघालो. त्यावेळीही भीती संपली नव्हती. कसेबसे घरात गेलो.
त्यानंतर गावाकडील नातेवाईकांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, वीजपुरवठा खंडित झाल्याने टॉवर बंद पडले होते, तर मोबाईलच्या बॅटऱ्या संपल्या होत्या. दुसऱ्यादिवशी गावाकडे दूरध्वनी करून सुखरूप असल्याचा निरोप दिला. काठमांडूहून एका बसने नेपाळ-भारत सीमेवर आलो. तेथून दुसऱ्या बसने गोरखपुरात पोहोचलो. त्यानंतर मुंबई-गोरखपूर रेल्वेने मनमाड व तेथून खासगी गाडीने गुरुवारी (दि. ३०) सकाळी गावात पोहोचलो.
टीचभर पोटासाठी साडेतीन ते चार हजार किलोमीटर दूर नेपाळमध्ये जाऊन राहिलेले नातेवाईक सुखरूप परत घरी पोहोचताच गावाकडील मंडळींच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. औक्षण करताना नातेवाईकांच्या आनंदाला पारावर उरला नाही. साक्षात मृत्यूच्या दाढेतून सुखरूप परत आलेल्या आमच्या लोकांचा पुनर्जन्मच झाला असल्याची प्रतिक्रिया पोपट चव्हाण यांची बहीण सरस्वती पवार यांनी दिली.
परतीच्या मार्गावरही संकटांची गर्दी
नेपाळमध्ये झालेल्या भूकंपात हजारोजणांचा मृत्यू झाला. उपचारासाठी रुग्णालयात जागा नाही, तर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी शिल्लक नाही. सर्वत्र दुर्गंधी आणि रडारड सुरू होती. मॅगी व बिस्किटे खाऊन कसेबसे तीन दिवस काढले. भूकंपाचे भयही अजून संपले नव्हते. त्यामुळे आम्ही गावी येण्याचा निर्णय घेतला. परंतु, हातात नेपाळी चलन होते. भारतीय चलन नसल्याने पुन्हा आम्ही संकटात सापडलो. अखेर वाळूजचे संजय बागल यांच्याकडून भारतीय चलन घेऊन आम्ही गावचा प्रवास सुरू केला, असेही पोपट चव्हाण यांनी सांगितले.