कोल्हापुरात थंडीची लाट; तापमान १२ डिग्रीपर्यंत खाली, शेतीच्या कामावरही परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 12:13 IST2025-12-11T12:11:42+5:302025-12-11T12:13:12+5:30
दिवसभर हुडहुडी : थंड वाऱ्यामुळे अंगातील गारठा जाईना

छाया-आदित्य वेल्हाळ
कोल्हापूर : जिल्ह्याचा पारा १२ डिग्रीपर्यंत खाली आल्याने दिवसभर अंगातील हुडहुडी जात नाही. पहाटेपासून थंडीचा कडाका वाढत जातो, सकाळी दहापर्यंत घराबाहेर पडू देत नाही. त्यात दिवसभर थंड वारे वाहत असल्याने गारठा जात नाही. आगामी आठ दिवस तापमान असेच राहणार असल्याने गारठा वाढण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानात घट होत आहे. मध्यंतरी ढगाळ व पावसाळी हवामानामुळे एकदमच थंडी गायब झाली होती. त्यानंतर आता थंडी सुरू झाली आहे. किमान तापमान १२ डिग्री तर कमाल २८ डिग्रीपर्यंत खाली आल्याने हुडहुडी वाढली आहे. सकाळी घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे.
सकाळी दहापर्यंत अंगातून थंडीच जात नाही. अकरानंतर हळूहळू कमी होते, पण सायंकाळी साडेपाचनंतर पुन्हा वाढू लागते. सायंकाळी सातनंतर थंड वारे वाहण्यास सुरुवात होते. आगामी आठ दिवस किमान आणि कमाल तापमान असेच स्थिर राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे.
शेती, पाणवठ्याशेजारी गारठा अधिक
शेती, तळे, विहिरी, नदीच्या शेजारी गारठा अधिक जाणवतो. येथे सकाळी व रात्री कमालीची थंडी जाणवते. या परिसरातून जाताना अंग गोठल्यासारखे वाटते.
शेतीच्या कामावरही परिणाम
ग्रामीण भागात पहाटे पाचपासून दिवस सुरू होतो. जनावरांसाठी वैरण आणणे, दूध काढून ते सकाळी साडेसहापर्यंत संस्थेत घालणे ही लगबग सुरू असते. थंडीमुळे या कामावर परिणाम झाला आहे. ऊसतोड मजूर, पिकांना पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे.
सकाळी, सायंकाळी शेकोट्यांची धग
ग्रामीण भागात सकाळी व सायंकाळी ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसतात. ऊसतोड मजूर तर उसाचा पाला पेटवून त्या धगीवर ऊस तोडून बांधतात.
ज्येष्ठ नागरिकांना त्रास
या थंडीचा सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरिकांना होत आहे. त्यामुळे थंडीपासून त्यांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्यांना ऊबदार कपडे, गरम जेवण, आणि मायेची ऊब देण्याची गरज असते. अनेकदा ही थंडी जीवघेणीही ठरू शकते.