ढगफुटीसदृश पावसाचे शहरात थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:54 AM2017-09-25T00:54:58+5:302017-09-25T00:55:02+5:30

Clouds in the rainy season | ढगफुटीसदृश पावसाचे शहरात थैमान

ढगफुटीसदृश पावसाचे शहरात थैमान

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : तब्बल दोन तास ढगफुटीसदृश झालेल्या धुवाधार पावसाने रविवारी दुपारी शहर व परिसरास झोडपले. या पावसाने रस्त्यांवर ठिकठिकाणी पाण्याची तळी साचल्याने वाहतुकीची कोंडी होऊन वाहनधारकांचे हाल झाले. अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचीही मंदिरात गुडघाभर पाणी आल्याने त्रेधातिरपीट उडाली, तसेच लक्ष्मीपुरीतील आठवडा बाजारातही या पावसामुळे विक्रेत्यांसह नागरिकांची दाणादाण उडाली.
रविवारी दुपारपर्यंत उन्हाच्या झळा जाणवत होत्या; परंतु दुपारनंतर वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले. दुपारी दोननंतर आभाळ काळवंडून आले व तीनच्या सुमारास पावसाला सुरुवात होऊन बघता-बघता ढगांच्या गडगडाटासह पावसाने जोर धरला. शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटीसदृश पावसाची आठवण या निमित्ताने पुन्हा आली. रविवारी दुपारी तीनपासून जवळपास सायंकाळी पाचपर्यंत झालेल्या मुसळधार पावसाने शहरांमधून जाणारे ओढे व नाले तुडुंब भरून वाहू लागले. बहुतांश ठिकाणी पाणी रस्त्यावर आल्याने वाहनधारकांना कसरत करतच जावे लागले. अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहतूक खोळंबली. लक्ष्मीपुरी, व्हीनस कॉर्नर, सुतारवाडा, शाहूपुरी येथील सखल भागात गुडघाभर पाणी साचले होते. लक्ष्मीपुरीतील आठवडा बाजारातही गुडघाभर पाणी आल्याने विक्रेत्यांसह ग्राहकांची तारांबळ उडाली. सायंकाळी पाचनंतर पाणी ओसरल्याने बाजारपेठेची परिस्थिती पूर्वपदावर येऊन व्यवहार पूर्ववत सुरू झाले. देवकर पाणंद येथील घरांमध्ये पाणी शिरल्याने लोकांची धावपळ उडाली तर शनिवार पेठेत या पावसाने एका घराची भिंत कोसळली परंतु सुदैवाने जीवितहानी झाली नाही. काही वेळांतच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी भेट देऊन मदतकार्य केले.
सध्या नवरात्रौत्सव असल्याने अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या शहर, जिल्ह्यातील भाविकांसह परराज्यांतील पर्यटकांची त्रेधातिरपीट उडाली. मंदिरासह परिसरात गुडघाभर पाणी आल्याने यातूनच भाविकांना दर्शनासाठी जावे लागले.
शहरासह कसबा बावडा, कळंबा, पाचगांव, उचगांव, सानेगुरुजी वसाहत, देवकर पाणंद, रामानंद नगर, जरगनगर, संभाजीनगर आदी उपनगरांतील भागालाही पावसाने झोडपले. या ठिकाणीही ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने आबालवृद्धांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सायंकाळी काही काळ विश्रांती घेतलेल्या पावसाने रात्री पुन्हा विजांच्या कडकडाटात जोरदार हजेरी लावल्याने शहरात पुन्हा ठिकठिकाणी पाणी साचले.
दोन घरांत शिरले पाणी
शहरात झालेल्या मुसळधार पावसाने देवकर पाणंद येथील ओढ्याला पूर येऊन पाणी हर्षद ठाकूर यांच्या घरामध्ये शिरले; तर फिरंगाई तालीम, शिवाजी पेठ येथे शरद यादव यांच्या घरी ड्रेनेजचे पाणी शिरले. शनिवार पेठ, सोन्यामारुती चौकात जे. बी. पाटील यांच्या जुन्या धोकादायक घराची भिंत पडली. तिन्ही घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान कृष्णात मिठारी, शैलेश कांबळे, सर्जेराव लोहार, खानू शिनगारे, उदय शिंदे, जयवंत डकरे यांनी धाव घेत घरात घुसलेले पाणी बाहेर काढण्यास मदत केली. या तिन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
करवीर पूर्व व दक्षिण भागात मुसळधार पाऊस
उचगाव : रविवारी दुपारनंतर उचगाव परिसरात विजांचा गडगडाट सुरू होऊन एक तास पाऊस झाला, तर रात्री सातनंतर जोरदार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे गल्लोगल्लीतील गटारी उलटून रस्त्यावरून पाणी वाहत होते. सखल भागातील खड्ड्यांत पाणी साचून राहिले. पावसाने गावातील विविध मंदिर परिसरात नवरात्रीच्या निमित्ताने आलेल्या भाविकांची मोठी तारांबळ उडाली. महामार्गावर तुरळक वाहनांची ये-जा सुरू होती. पावसाच्या जोरदार धारांमुळे गाडीचे लाईट लावूनही समोरचा रस्ता दिसेनासा झाला. रात्री उशिरापर्यंत या परिसरात पावसाची संततधार कायम होती.

Web Title: Clouds in the rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.