कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर कर संकलन करण्यासाठी कागल, तसेच राज्यात उभारण्यात येणारे २४ खासगी सीमा तपासणी नाके बंद करावेत, राज्यातील वाहतूकदारांच्या समस्या सोडवाव्यात तसेच कोल्हापुरात तावडे हॉटेल जवळील १३.५ एकर जागेवर ट्रक टर्मिनन्स उभारण्याबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना रविवारी शासकीय विश्रामगृहात कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनने निवेदन दिले. याबाबत परिवहन विभाग आणि आयुक्तांची लवकरच बैठक बोलावण्याचे आश्वासन आबिटकर यांनी दिले.संपूर्ण देशात जीएसटी तथा ऑनलाइन कर भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्यापासून सीमेवर तपासणी नाके ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे केंद्र शासनाने प्रत्येक राज्यास कळविले आहे. त्यानुसार अनेक राज्यांनी त्यांच्या सीमेवरील तपासणी नाके बंदही केले आहेत. राज्य सरकारनेही डिसेंबर २०२४ मध्ये लोकआयुक्त आणि राज्यपालांच्या आदेशानुसार हे तपासणी नाके बंद करण्याचा आदेश पाळण्याऐवजी त्याचे उल्लंघन केलेले आहे. उलट कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे परिवहन विभागाने बेकायदेशीररीत्या १० डिसेंबर २०२४ रोजी खासगी सीमा तपासणी नाक्याचे काम जबरदस्तीने पूर्ण केले आहे. याविरोधात कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनने दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू केले आहेत. यासंदर्भात तसेच राज्यातील वाहतूकदारांच्या समस्या सोडवाव्यात आणि कोल्हापुरात तावडे हॉटेल जवळील १३.५ एकर जागेवर ट्रक टर्मिनन्स उभारण्याबाबत अध्यक्ष सुभाष जाधव, उपाध्यक्ष भाऊ घोगळे, सचिव हेमंत डिसले, खजानीस प्रकाश केसरकर यांनी आबिटकर यांना भेटून निवदेन दिले. यासंदर्भात लवकरच आयुक्त आणि परिवहन विभागासोबत बैठक बोलावू, असे आश्वासन आबिटकर यांनी या शिष्टमंडळाला दिले.
राज्यातील २४ खासगी सीमा तपासणी नाके बंद करा, लॉरी असोसिएशनची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 12:01 IST