कोल्हापूर : बारावीचा पेपर अवघड गेल्याने नैराश्यातून शिवाजी पेठ, जुना वाशी नाका परिसरातील संचिता लक्ष्मण कडव (वय १७) या विद्यार्थिनीने मंगळवारी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली.संचिता हिने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. मात्र, काही पेपर अवघड गेल्यामुळे कमी गुण मिळतील, अशी भीती तिला वाटत होती. पालकांनी तिला काही घाबरू नकोस, जितके गुण मिळतील तेवढ्यावर समाधानी राहा, असे सांगितले होते. मात्र, ती नैराश्यात गेली. मंगळवारी सायंकाळी तिने खोली बंद केली. त्यावेळी घरातील काही मंडळीनी तिला बोलावले. मात्र, तिने प्रतिसाद दिला नाही. काही वेळाने तिने फॅनच्या हुकाला साडीने गळफास लावून घेतला. संचिता हिचे वडील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात फुले विक्रीचे काम करतात. तर आई गृहिणी आहे. सायंकाळी सातनंतर तिला बोलावण्यासाठी गेले असता हा प्रकार उघडकीस आला. तिला तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे. दरम्यान, मुलीच्या आत्महत्येने नातेवाइकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. घटनेची नोंद सीपीआरमध्ये पोलिस चौकीत झाली.
पेपर अवघड गेल्याने बारावीच्या विद्यार्थिनीने संपवले जीवन, कोल्हापुरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 12:29 IST