शहर डीवायएसपी मंगेश चव्हाणांची इस्लामपूरला बदली, सांगलीचे टिके कोल्हापूरला
By उद्धव गोडसे | Updated: May 23, 2023 13:41 IST2023-05-23T13:40:09+5:302023-05-23T13:41:56+5:30
राज्यातील ३०९ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या.

शहर डीवायएसपी मंगेश चव्हाणांची इस्लामपूरला बदली, सांगलीचे टिके कोल्हापूरला
कोल्हापूर : शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांची इस्लामपूर येथे बदली झाली, तर सांगली शहरचे उपअधीक्षक अजित टिके यांची कोल्हापूर शहरला बदली झाली. राज्यातील १६६ पोलिस उपअधीक्षकांची, तर १४३ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची पदोन्नतीने बदली झाली. गृह विभागाचे अवर सचिव स्वप्नील बोरसे यांनी सोमवारी (दि. २२) रात्री उशिरा बदल्यांचे जारी केले.
एकाच ठिकाणी तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेल्या उपअधीक्षकांच्या बदल्या झाल्या. यात कोल्हापूर शहरचे उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांची इस्लामपूर येथे बदली झाली. सांगली शहरचे उपअधीक्षक अजित टिके यांची कोल्हापूर शहरला बदली झाली. पदोन्नतीने झालेल्या बदल्यांमध्ये पोलिस अधीक्षक कार्यालयातील सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय गोरले यांची गुन्हे अन्वेषण विभाग कोल्हापूरकडे अपर पोलिस अधीक्षक पदी बदली झाली.
अंबरुषी फडतरे यांची नागरी हक्क संरक्षण विभागाकडे, तर समरसिंग साळवे यांची मनमाडहून इचलकरंजीला बदली झाली. जयकुमार सोमवंशी यांची शाहूवाडी उपविभागीय उपअधीक्षक पदी बदली झाली, तर बी. आर. पाटील यांची विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात बदली झाली. तातडीने बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.