Coronavirus in Maharashtra रुग्णांच्या संख्येत वाढ नागरिकांनी अजिबात घाबरु नये - जिल्हाधिकारी दौलत देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 23:01 IST2020-05-20T22:42:17+5:302020-05-20T23:01:29+5:30
रत्येक बाहेरुन आलेल्यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. तो गृह अलगीकरणात, संस्थात्मक अलगीकरणात राहतो की नाही. सामाजिक अंतर ठेवतो का यावर नजर ठेवावी. जेणेकरुन कोणताही धोका होणार नाही, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

Coronavirus in Maharashtra रुग्णांच्या संख्येत वाढ नागरिकांनी अजिबात घाबरु नये - जिल्हाधिकारी दौलत देसाई
कोल्हापूर : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबई, पुणे आणि सोलापूर या ठिकाणाहून रेड झोन आणि कंटेन्मेंट झोनमधून कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे स्वॅब घेण्यात आले आहेत. परिणामी बाधित रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. ही तपासणी केली नसती तर गावामध्ये फार मोठ्याप्रमाणात प्रादुर्भाव होण्याची शक्यता होती. त्यामुळे नागरिकांनी अजिबात घाबरु नये परंतु, योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.
जिल्ह्यामध्ये कोव्हिड-19 च्या रुग्णांची संख्या गेल्या दोन दिवसांपासून वाढत आहे. आज ती संख्या सकाळी 134 होती. याचे एकमेव कारण म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबई, पुणे आणि सोलापूर या ठिकाणाहून रेड झोन आणि कंटेन्मेंट झोनमधून मोठ्या प्रमाणात व्यक्ती जिल्ह्यात आल्या आहेत. यामधील जास्तीत जास्त लोकांच्या स्वॅब तपासणीचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, यानुसार ही तपासणी केली.
आता या तपासणीचे अहवाल आता येत आहेत. बाहेरुन आलेल्या सर्व लोकांचे अहवाल हे पॉझिटिव्ह येत आहेत. यात कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवाशाचा समावेश नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणीही घाबरुन जावू नये. हे जर पाऊल आपण उचललं नसतं तर हे बाधित लोक गावा गावात गेले असते आणि मोठ्या प्रमाणात गावातल्या लोकांना झाला असता. जरी या लोकांना गृह अलगीकरण किंवा संस्थात्मक अलगीकरणात ठेवले असते तरी या लोकांच्या बेसावधतेमुळे इतरांना प्रादुर्भाव झाला असता. हा प्रादुर्भाव या पध्दतीने तपासणी करुन वाचवला आहे.
कोव्हिड केअर सेंटरमध्ये तपासणी करावी
विना परवानगी, वेगवेगळ्या मार्गाने, माल वाहतूक वाहनामधून गावा गावात आलेले आहेत. अशा लोकांनी ज्यांची तपासणी झाली नाही, अशा लोकांना त्यांच्या कुटुंबियांनी, ग्रामस्थांनी कोव्हिड केअर सेंटरमध्ये घेवून जाणे आवश्यक आहे, त्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. त्यांना कोणतीही लक्षणे असतील तर अशा लोकांना तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात संपर्क करावा. जेणेकरुन त्यांच्या कुटुंबियांना तसेच ग्रामस्थांना प्रादुर्भाव होणार नाही. आपल्या जिल्ह्यालाही धोका होणार नाही. पॉझिटिव्ह येणाऱ्या सर्व रुग्णांना सीपीआर, डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालय किंवा तालुकास्तरावरील कोव्हिड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येत आहे. त्यामुळे यांच्यापासून इतरांना कोणताही धोका नाही. पण गावातल्या, शहरातल्या लोकांनी सावध राहणे आवश्यक आहे. प्रत्येक बाहेरुन आलेल्यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. तो गृह अलगीकरणात, संस्थात्मक अलगीकरणात राहतो की नाही. सामाजिक अंतर ठेवतो का यावर नजर ठेवावी. जेणेकरुन कोणताही धोका होणार नाही, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.