Kolhapur: 'महादेवी' हत्तीणसाठी मोर्चा गावात धडकला.. 'वनतारा'साठी गाड्या गावाजवळ थडकल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 13:36 IST2025-07-26T13:36:40+5:302025-07-26T13:36:58+5:30

चार दिवसांपासून अ‍ॅनिमल अ‍ॅम्ब्युलन्स हायवेवर

Citizens oppose the transfer of the Mahadevi elephant of Swastishree Jinsen Bhattarak Pattacharya Sansthan Math in Nandani Shirol taluka to Vantara in Gujarat | Kolhapur: 'महादेवी' हत्तीणसाठी मोर्चा गावात धडकला.. 'वनतारा'साठी गाड्या गावाजवळ थडकल्या

Kolhapur: 'महादेवी' हत्तीणसाठी मोर्चा गावात धडकला.. 'वनतारा'साठी गाड्या गावाजवळ थडकल्या

जयसिंगपूर : नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थान मठाचा माधुरी उर्फ महादेवी हत्तीण गुजरात येथील वनतारा हत्तीण केंद्रात कोणत्याही परिस्थिती देणार नाही, ही भूमिका कायम ठेवून शुक्रवारी हजारोंच्या संख्येने सर्वधर्मीय लोक एकवटले. हत्तीण बचावासाठी गाव बंद ठेवून मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात समस्त जैन समाज व नागरिक सहभागी झाले होते. दरम्यान, मूक मोर्चा झाल्यानंतर आम्ही हत्ती देणार नाही, अशा तीव्र भावना व्यक्त केल्या. 

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलबाहेर हत्ती नेण्यासाठी गुजरातहून आलेल्या दोन गाड्या थांबल्या आहेत. त्यामुळे हत्तीणीला लवकरच हलविले जाणार असल्याचे वातावरण असल्याने नांदणीकरांचा संभ्रम वाढला आहे.

नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाकडे चारशे वर्षांपासून हत्ती आहे. एका बाजूला प्राण्यांच्या गुणवत्तापूर्ण जीवनाच्या हक्काचा आणि धार्मिक विधीसाठी हत्तीच्या वापराच्या हक्काचा संघर्ष असताना प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच नोंदविले होते. त्यानुसार नांदणी येथील माधुरी उर्फ महादेवी हत्तीणला गुजरात येथे दोन आठवड्यांत पाठविण्याचे परवानगी दिली आहे; मात्र, नांदणी मठाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

या पार्श्वभूमीवर हत्ती केंद्राचे पथक गुरुवारी रात्री हत्तीला नेण्यासाठी येणार असल्याचा समज निर्माण झाल्याने नागरिक रस्त्यावर उतरले होते. कोणत्याही परिस्थितीत हत्तीला नेऊ देणार नाही, अशी भूमिका घेत शुक्रवारी नांदणी येथे मूक मोर्चाचे आवाहन केले होते.

सकाळी नांदणी येथील गांधी चौकातून मूक मोर्चाला सुरुवात झाली. भरत बँक येथून बाजारपेठ, ग्रामपंचायत, कुरुंदवाड रोड, भैरवनाथ मंदिर पुन्हा यासह विविध मार्गासह येत जयसिंगपूर मार्गावरील निशीधी येथे मोर्चा विसर्जित झाला. त्यानंतर नागरिकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.
माजी खासदार राजू शेट्टी, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, सावकार मादनाईक, पृथ्वीराजसिंह यादव, आप्पासो लठ्ठे, शेखर पाटील, डॉ.सागर पाटील, अजय पाटील-यड्रावकर, युनूस पटेल, सागर शंभूशेट्टे, वैभव उगळे आदी सहभागी झाले होते. शिरोळ व जयसिंगपूर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

सुनावणी तारखेकडे लक्ष

हत्ती नांदणी मठाकडे राहण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी पुढे गेली आहे. तत्काळ सुनावणी घेण्यासाठी उच्च न्यायालयाला विनंती केली आहे. याबाबतची तारीख लवकरच निश्चित होणार आहे.

मूक मोर्चात लक्षवेधी फलक

मूक मोर्चात नांदणी पंचक्रोशीतून सर्वधर्मीय नागरिक सहभागी झाले होते. यावेळी गाव बंद ठेवून हत्तीण बचावासाठी सर्वांनी पाठिंबा दिला. मोर्चात आपली हत्ती, आपली परंपरा, लढायचं भिडायचं ते आपल्या माधुरीसाठीच, शांततेच्या मार्गाने लढू अखेरपर्यंत माधुरीसाठीच भिडू, लढाई माधुरीच्या अस्तित्वासाठी, लोकलढा उभारू अस्तित्व जपण्यासाठी, संघर्ष करू दक्षिण भारताची शान राखण्यासाठी असे फलक लक्षवेधी ठरले.

मागितला तर बंदोबस्त मिळणार

हत्तीला दोन आठवड्यांत नेण्याचे आदेश देण्यात आल्याने गुजरात पासिंगच्या दोन गाड्या कोल्हापूर जिल्ह्याच्या वेशीजवळ येऊन थांबला आहेत. दि.३१ तारखेपर्यंत कधीही याबाबत कार्यवाही होवू शकते. यासाठी वनविभागाने पोलिसांकडे बंदोबस्त मागितला तर दिला जाऊ शकताे.

मुक्काम जिल्ह्याबाहेर का..

हत्तीणीला नेण्यासाठी हे पथक गेल्या चार दिवसापासून या हॉटेलबाहेर थांबले आहे. मात्र चालक दोन दिवसापासून आलो असल्याचे सांगत आहेत. शिवाय आम्ही बंगरूळला जाणार आहोत असे सांगितले जात आहे. हे पथक हत्तीणीला नेण्यासाठीच आले असले तर एवढी लपवाछपवी का? असा सवाल केला जात आहे.

हत्तीची वैद्यकीय तपासणी

नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाच्या माधुरी उर्फ महादेवी हत्तिणीला नेण्यासाठी नागरिकांचा विरोध असल्याने वनताराचे पथक अद्याप नांदणी येथे आलेले नाही. मात्र शुक्रवारी दुपारी वनविभाग अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत डॉक्टरांनी हत्तीची वैद्यकीय तपासणी केली.

विशेष हत्ती कल्याण केंद्रात नेणार

न्यायालयाने दोन आठवड्यात हत्तिणीला गुजरात येथे पाठविण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार गुजरात राज्यातील जामनगर जिल्ह्यातील वनतारा राधेकृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्टच्या विशेष हत्ती कल्याण केंद्रात नेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीजवळ हे पथक दाखल झाले आहे. हत्तीला नेण्यासाठी नागरिकांचा विरोध असल्याने पथकाचा मुक्काम वाढला आहे.

दरम्यान, शुक्रवारी दुपारी वनविभागाचे सहायक वनसंरक्षक कमलेश पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे यांच्यासह कर्मचारी यांच्या उपस्थितीत तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आर. बी. देशमुख यांच्या पथकाने हत्तीची वैद्यकीय तपासणी केली. यावेळी शिरोळ पोलिस देखील उपस्थित होते.

Web Title: Citizens oppose the transfer of the Mahadevi elephant of Swastishree Jinsen Bhattarak Pattacharya Sansthan Math in Nandani Shirol taluka to Vantara in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.