महापालिकेला घेराव
By Admin | Updated: July 9, 2014 01:02 IST2014-07-09T00:51:54+5:302014-07-09T01:02:39+5:30
निषेधाच्या घोषणा : हद्दवाढीतून वगळण्याची वळिवडे ग्रामस्थांची मागणी

महापालिकेला घेराव
कोल्हापूर : महानगरपालिकेतर्फे प्रस्तावित हद्दवाढीतून वळिवडे गावास वगळण्यात यावे, अशी मागणी करतानाच हद्दवाढीत येण्यास वळिवडेसह सर्व १७ गावांचा विरोध असताना शासनाने हद्दवाढीचा निर्णय लादल्यास गंभीर परिणामांचा इशारा आज, मंगळवारी वळिवडे (ता. करवीर) ग्रामस्थांनी महापालिका प्रशासन व जिल्हाधिकारी राजाराम माने यांना निवेदनाद्वारे दिला. दरम्यान, ग्रामस्थांनी सुमारे अर्धा तास महापालिकेला घेराव घालून हद्दवाढ विरोधी घोषणा दिल्या. आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी केले.
दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वळिवडे गावातून आलेल्या तरुण व ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी करत महापालिकेकडे जाणारे सर्व रस्ते बंद केले. त्यानंतर महापालिकेच्या दारात सुमारे तासभर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनात सर्वच पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. महापालिका प्रशासन व हद्दवाढविरोधी घोषणांनी यावेळी परिसर दणाणून गेला. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त उमेश रणदिवे यांनी निवेदन स्वीकारले. अचानक इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या वाहनधारक आंदोलकांमुळे भाऊसिंगजी रोडवर वाहतुकीची कोंडी झाली.
यावेळी सरपंच रेखा पळसे, उपसरपंच सुरेश माने, सदस्य सुहास तामगावे, सुरेश पवार, सचिन चौगले, अनिल पंढरे, रावसाहेब दिगंबरे, कृष्णात शेळके, बळी खांडेकर, सचिन पाटील, रणजित कुसाळे, प्रकाश शिरोटे, रावसाहेब दिगंबरे, आदींसह ग्रामस्थ, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)