चित्रनगरी - कंदलगाव कमान रस्ता खड्ड्यातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:28 IST2021-09-17T04:28:17+5:302021-09-17T04:28:17+5:30
पाचगाव : वारंवार निवेदने दिली, आवाज उठविला तरी कंदलगाव कमान ते चित्रनगरी या रस्त्यावरचे खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाला अद्यापही ...

चित्रनगरी - कंदलगाव कमान रस्ता खड्ड्यातच
पाचगाव : वारंवार निवेदने दिली, आवाज उठविला तरी कंदलगाव कमान ते चित्रनगरी या रस्त्यावरचे खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाला अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे या रस्त्यावरील वाहतूक प्रचंड जीवघेणी बनली आहे. रोज छोटे-मोठे अपघात होऊन अनेकांना हॉस्पिटलची पायरी चढावी लागत आहे. त्यामुळे एखादा बळी गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार आहे का, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. शहरापासून जवळच असलेल्या भारती विद्यापीठ, केआयआयटी कॉलेज, चित्रनगरी - कंदलगाव, गोकुळ शिरगाव एमआयडीसी, याठिकाणी ये-जा करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. पंधराशे ते दोन हजार कर्मचारी गोकुळ शिरगाव एमआयडीसीला याच मार्गावरून ये-जा करत असतात. परंतु, रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी खड्डे पडल्याने वाहनधारकांना या रस्त्यावरून वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. खड्ड्यांमुळे अनेकदा छोटे-मोठे अपघात घडले आहेत. यात अनेकजण जखमी होऊन कायमची दुखापती झाली आहे. अनेकांच्या पाठीच्या मणक्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. विशेष म्हणजे गेल्या आठ दिवसात तीन ते चार जण जखमी झाले. मात्र, प्रशासन अद्याप याकडे लक्ष द्यायला तयार नसल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.
चौकट : भारती विद्यापीठाशेजारी आरटीओ पासिंग सेंटर असल्याने ट्रकसारखी अवजड वाहने याच रस्त्यावरून प्रवास करतात. त्यामुळे हा रस्ता जास्तच खराब झाला आहे. पुणे - बेंगलोर हायवेपासून जवळच असल्याने अनेक वाहनधारक याच रस्त्याचा आधार घेतात. परंतु हा रस्ता इतका छोटा आहे की समोरून एखादे ट्रकसारखे अवजड वाहन आले तर मोटरसायकल चालवणाऱ्याला गाडी बाजूला घेताना दमछाक होते. या रस्ता रुंदीकरणाची मागणी करूनदेखील याकडे दुर्लक्ष केले आहे.
कोट : कंदलगाव कामानीपासून ते चित्रनगरीपर्यंतच्या या रस्त्याचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे. आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडे पाठपुरावा चालू असून, लवकरच हा रस्ता खड्डे मुक्त होईल. - अर्चना साहिल पाटील, सरपंच, कंदलगाव
फोटो १६ पाचगाव रस्ता :
कंदलगाव कमानीपासून ते चित्रनगरी रस्त्यावर मोठ खड्डे पडले आहेत.