कोल्हापूरच्या ‘फौंड्री’ला चिनी हाय प्रेशर मोल्डिंग मशीनचे आता बळ; युरोपसह जपानच्या महागड्या मशीनला पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 17:05 IST2025-08-06T17:04:35+5:302025-08-06T17:05:55+5:30
स्वस्त आणि अधिक उत्पादनक्षम असल्याने कोल्हापूरच्या फौंड्री उद्योगाला गती येणार

कोल्हापूरच्या ‘फौंड्री’ला चिनी हाय प्रेशर मोल्डिंग मशीनचे आता बळ; युरोपसह जपानच्या महागड्या मशीनला पर्याय
कोल्हापूर : भारतातील फौंड्री उद्योगाची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी चिनी कंपन्यांची मदत घेतली जात आहे. शिरोली एमआयडीसी येथील तरुण उद्योजकांनी चीनमधील कंपन्यांशी करार केला असून, त्यातून कोल्हापूरला हायप्रेशर मोल्डिंग मशीन मिळणार आहेत. युरोप आणि जपानी मशीनच्या तुलनेत चिनी मशीन स्वस्त आणि अधिक उत्पादनक्षम असल्याने कोल्हापूरच्या फौंड्री उद्योगाला गती येणार असल्याचा विश्वास उद्योजकांनी व्यक्त केला.
कोल्हापूरचा फौंड्री उद्योग अलीकडे गतीने वाढत आहे. यात ॲटो सेक्टरमधील विविध प्रकारचे पार्ट तयार करण्यासाठी मोल्डिंग मशीनचा वापर केला जातो. यासाठी युरोपीय देशांसह जपानमधून आयात केलेल्या मोल्डिंग मशीनचा वापर केला जातो. मात्र, या मशीन महागड्या असल्याने छोट्या कंपन्यांना परवडत नाहीत.
शिरोली एमआयडीसीमधील विजय फौंड्री इक्विपमेंट या कंपनीने चिनी मशीनचा पर्याय शोधला आहे. चिनी कंपन्यांशी करार केला असून, स्थानिक फौंड्री उत्पादकांना अत्याधुनिक मशीनचा पुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती विजय फाऊंड्री एक्विपमेंटचे प्रमुख विजय पवार यांनी दिली.
उत्पादनांचा दर्जा वाढणार
इतर देशांच्या तुलनेत चिनी बनावटीचे हाय प्रेशर मोल्डिंग मशीन अत्याधुनिक आहे. त्याची कार्यक्षमता जास्त आहे. दर्जा आणि गुणवत्तेतही ते कमी नाही. यामुळे कोल्हापूरच्या फाऊंड्री उत्पादनांचा दर्जा वाढणार आहे. छोट्या उद्योजकांनाही ते परवडणारे असल्याने जिल्ह्यातील फाऊंड्रीचा विस्तार होण्यास मदत होईल, असा विश्वास उद्योजक पवार यांनी व्यक्त केला.
हाय प्रेशर मोल्डिंग मशीन पूर्णत: स्वयंचलित आहे. त्याची उत्पादनक्षमता आणि टिकाऊपणा चांगला आहे. त्यामुळे भारतासह कोल्हापूरच्या फौंड्री उद्योगाला नवसंजीवनी मिळेल. चिनी कंपनीशी करार करताच कोल्हापुरातील नामांकित पाच कंपन्यांनी हाय प्रेशर मोल्डिंग मशीनची मागणी नोंदवली आहे. - विजय पवार - उद्योजक