‘आता आमचेही ऐका’तून बालकांचे कलाविष्कार
By Admin | Updated: March 8, 2017 00:49 IST2017-03-08T00:49:35+5:302017-03-08T00:49:47+5:30
रंगतदार कार्यक्रम : वीटभट्टी, ऊसतोड, भंगारवेचक कुटुंबांतील मुलांनी सादर केली कला

‘आता आमचेही ऐका’तून बालकांचे कलाविष्कार
कोल्हापूर : ‘दंगल’ चित्रपटातील ‘बापू सेहत के लिए’ यासह ‘मराठमोळं गाणं’ अशा अप्रतिम गीतांवर वीटभट्टी, ऊसतोड व भंगारवेचक कुटुंबातील मुलांनी आपली कला सादर केली. निमित्त होतं ‘अवनि’ आयोजित स्वाभिमानी बालहक्क अभियान व बाल अधिकार मंच यांच्या वतीने ‘आता आमचेही ऐका’ या कार्यक्रमाचे.
मंगळवारी शाहू स्मारक भवनात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ. कुणाल खेमनार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा न्यायाधीश वृषाली जोशी, संस्थेच्या उपाध्यक्षा अनुराधा भोसले, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा प्रिया चोरगे, आदींच्या उपस्थितीत सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा तसेच महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांतून स्थलांतरित होणाऱ्या वीटभट्टी, ऊसतोडणी व बांधकाम क्षेत्रातील मजुरांच्या मुलांसाठी व भंगारवेचक बालकांच्या शिक्षणाच्या अधिकारासाठी ही संस्था काम करते.
यावर आधारित ‘आता आमचेही ऐका’ या कार्यक्रमातून या मुलामुलींनी त्यांचे प्रश्न मांडले.
वीटभट्टी कामगारांच्या मुलांनी बालकामगारांंचे जीवन नृत्यातून तसेच अशा बालकामगारांना शिक्षणाची गरज किती आहे हे मूकनाट्याच्या माध्यमातून सादर केले.
बालगृहातील मुलांनी ‘सर्वधर्म समभाव’ या नाटकाचे सादरीकरण करून सर्व धर्मांचे विचार एक असून सर्व बांधवांनी गुण्यागोविंदाने राहिले पाहिजे, हा संदेश यातूून दिला . त्याचप्रमाणे देशभक्तिपर, शैक्षणिक गीताचे सादरीकरण केले. ‘राधे-राधे श्याम’,‘देश है रंगीला’, ‘चला मुलांनो, चांदोबाची शाळा’ या गीतासह कोळीगीत सादर केले. त्याचबरोबर ‘मुली वाचवा’ हा संदेश देत ‘सेव्ह द बेबी गर्ल’ यावर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. अवनि संस्थेमधील मुलांच्या सहभागातून हा कार्यक्रम साकारला होता. या कार्यक्रमातून बालकलाकारांनी उपस्थितांची मने जिंकून वाहवा मिळवली.
समाजातील अशा वंचित घटकांच्या मदतीसाठी आम्ही सदैव तयार असल्याचे यावेळी कुणाल खेमनार, संजय शिंदे यांनी सांगितले. सायली मिसाळ, अस्मिता भोसले यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव, जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रदीप भोगले, अरुण चव्हाण, दिलीप पाटील, आर. वाय. पाटील, संजय पाटील यांच्यासह वनिता कांबळे, सुनीता भोसले, अमोल कवाळे, अमर कांबळे, पुष्पा शिंदे उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष साताप्पा मोहिते, जिल्हा समन्वयक जैनुद्दीन पन्हाळकर यांनी संयोजन केले. सोनालिका पोवार हिने आभार मानले.