Kolhapur: विसर्जन मिरवणुकीत चप्पल तुटेपर्यंत पोरं नाचली, सिमेंट कारखान्यात होणार चपलांची राख

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 18:03 IST2025-09-10T18:02:40+5:302025-09-10T18:03:13+5:30

तब्बल दहा ट्रॉली चप्पलने भरल्या

Children danced until their slippers broke during the immersion procession in Kolhapur, the ashes of the slippers will be thrown in the cement factory | Kolhapur: विसर्जन मिरवणुकीत चप्पल तुटेपर्यंत पोरं नाचली, सिमेंट कारखान्यात होणार चपलांची राख

Kolhapur: विसर्जन मिरवणुकीत चप्पल तुटेपर्यंत पोरं नाचली, सिमेंट कारखान्यात होणार चपलांची राख

पोपट पवार

कोल्हापूर : कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणूक अन् चपलांचे जागोजागी पडलेली ढीग हे चित्र कोल्हापूरकरांना नवे नाहीच. यंदा तर तब्बल दहा ट्रॉली चपला महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गोळा केल्या. आता याच चपला सिमेंट कारखान्यात ज्वलनासाठी कामी येणार आहेत. विशेष म्हणजे यातील ९० टक्के चप्पल या युवकांच्या आहेत. सध्या या चपला महापालिका प्रशासनाने कसबा बावड्यातील झूम प्रकल्पाजवळ ढीग मारून ठेवल्या असून त्या घेऊन जाण्यासाठी सिमेंट व साखर कारखान्यांशी संपर्क सुरू केला आहे.

कोल्हापूर शहरात शनिवारी गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या तालावर नाचताना अनेकांच्या पायातील चप्पल निघून पडल्या आहेत याचेच भान नव्हते. प्रचंड गर्दीमुळे आणि ढकलाढकलीमुळे अनेक लोकांच्या चपला पायातून निसटल्याने मिरजकर तिकटी ते पापाची तिकटी या मार्गावर चपलांचा ढीग पडला होता. महापालिकेच्या आरोग्य विभागाने दुसऱ्या दिवशी त्याचा तातडीने उठाव केला असता तब्बल दहा ट्रॉली चप्पलने भरल्या.

या चपलांचा ढीग तातडीने महापालिकेच्या झूम प्रकल्पाजवळ नेऊन ठेवण्यात आला. ज्यांच्याकडून प्रदूषण होणार नाही अशा सिमेंट कंपन्या किंवा कारखान्यांना या चप्पल दिल्या जाणार आहेत. त्यासाठी महापालिकेने संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. येत्या चार दिवसांत या चप्पल ज्यांना गरज आहे अशा कंपन्यांना दिल्या जातील, असे सहाय्यक आयुक्त कृष्णात पाटील यांनी सांगितले.

ज्यांच्याकडे प्रमाणपत्र त्यांनाच चप्पल

सिमेंट कंपन्यांमध्ये सिमेंट तयार करण्यासाठी ज्वलन प्रक्रिया केली जाते. कारखान्यांमध्येही हीच प्रक्रिया आहे. चपला उशीरपर्यंत जळत असल्याने कंपन्यांना ज्वलनासाठी चपलांची गरज असते. त्यामुळे प्रत्येक वर्षी सिमेंट कंपन्यांकडून चपलांची मागणी होते. मात्र, ज्यांच्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र आहे असेच कारखाने किंवा कंपन्यांना या चपला दिल्या जातात.

Web Title: Children danced until their slippers broke during the immersion procession in Kolhapur, the ashes of the slippers will be thrown in the cement factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.