"माझा कायम सन्मानच केला," राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी मंत्र्याकडून एकनाथ शिंदेंचे कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 14:00 IST2022-07-24T14:00:35+5:302022-07-24T14:00:45+5:30
विकासकामांसाठी मागितला तितका निधी दिल्याचे सांगत आपला शिंदेंनी सन्मान केल्याचंही माजी मंत्री म्हणाले.

"माझा कायम सन्मानच केला," राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी मंत्र्याकडून एकनाथ शिंदेंचे कौतुक
कागल : महाविकास आघाडी सरकार मधील ग्रामविकास आणि कामगार अशी महत्वाची खाती सांभाळणारे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कौतुक करीत त्यांचे जाहीर आभारही मानले.
कागल मधील श्रमीक वसाहत मधील मिळकतधारकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. तेव्हा आपल्या भाषणात आमदार मुश्रीफ यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. नगरविकस मंत्री म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडी सरकारात काम करीत होते. कागल बरोबरच गडहिंग्लज मुरगुड शहरासाठी मी विकास कामांनां जेवढा निधी मागितला तेवढा त्यांनी दिला. त्यांनी माझा नेहमी सन्मान केला आहे, असे मुश्रीफ म्हणाले.
आज जरी ते आमच्या विरोधी सरकारचे मुख्यमंत्री असले तरी कागलला कोट्यवधी रूपयांचा विकास निधी दिला. या बद्दल मला जाहीर आभार मानलेच पाहीजेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. या वेळी जिल्हा बॅकेचे संचालक भय्या माने, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, सदाशिव पिष्टे, नितीन दिंडे, प्रविण काळबर, अमित पिष्टे आदी मान्यवर उपस्थित होते.