Kolhapur: तब्बल ५० वर्षांनंतर पन्हाळगडावर येणारे मुख्यमंत्री फडणवीस पाचवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 12:10 IST2025-03-07T12:09:28+5:302025-03-07T12:10:26+5:30

तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण १९६२ मध्ये पन्हाळ्यावर सपत्नीक आले होते

Chief Minister Devendra Fadnavis is the fourth to visit Panhalgad after 50 years. | Kolhapur: तब्बल ५० वर्षांनंतर पन्हाळगडावर येणारे मुख्यमंत्री फडणवीस पाचवे

Kolhapur: तब्बल ५० वर्षांनंतर पन्हाळगडावर येणारे मुख्यमंत्री फडणवीस पाचवे

संदीप आडनाईक

कोल्हापूर : यशवंतराव चव्हाण, मारोतराव कन्नमवार, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण   यांच्यानंतर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी तब्बल ५० वर्षांनंतर पन्हाळगडावर आलेले देवेंद्र फडणवीस हे पाचवे मुख्यमंत्री आहेत.

पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेची स्थापना १९५४ मध्ये झाली. त्यानंतर पन्हाळ्याच्या मोरोपंत ग्रंथालयाची स्थापना ५ मे १९५९ रोजी झाली. त्यानंतर याच्या इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण १९६२ मध्ये पन्हाळ्यावर सपत्नीक आले होते. त्यानंतर १९६३मध्ये तत्कालीन मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार पन्हाळ्यावर आले होते. 

६ जून १९७४ रोजी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यारोहण सोहळ्याला तीनशे वर्षे पूर्ण झाली, तेव्हा मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पन्हाळगडावर हा त्रिशत संवत्सरी सोहळा पार पडला होता. छत्रपतींच्या राज्याभिषेकाची प्रतिकृती पन्हाळा नगरपालिकेने तेव्हा उभारली होती. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पन्हाळ्यावरील पुतळ्याचे अनावरण समारंभासाठी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण १९७६ मध्ये आले होते.

या आठवणी पन्हाळ्याचे ज्येष्ठ नागरिक संभाजी गायकवाड यांनी सांगितली. त्यानंतर आता तब्बल ५० वर्षांनंतर देवेंद्र फडणवीस पन्हाळगडावर आलेले पाचवे मुख्यमंत्री ठरले आहेत.

पन्हाळ्यावर अनेक दिग्गज राजकीय नेते विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने येऊन गेले आहेत. यामध्ये नंतर मुख्यमंत्रिपदावर राहिलेले ज्येष्ठ नेते शरद पवार, मनोहर जोशी, बॅ. ए. आर. अंतुले, वसंतदादा पाटील, लोकसभेचे सभापती शिवराज पाटील-चाकूरकर, गोव्याचे तात्कालीन मुख्यमंत्री श्रीपाद नाईक, शशीकला काकोडकर, मनोहर पर्रीकर यांच्यासह देशातील तसेच राज्यातील अनेक दिग्गज राजकीय नेत्यांचा समावेश आहे.

Web Title: Chief Minister Devendra Fadnavis is the fourth to visit Panhalgad after 50 years.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.