कोल्हापूर : शहरातील कचरा उठावाकरिता कार्यरत असलेल्या टिपर रिक्षांवर मंजुरीपेक्षा जास्त खर्च केल्याचे निदर्शनास येताच शनिवारी मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत देवराव पवार यांना महापालिकेच्या सेवेतून तत्काळ निलंबित करण्यात आले, तसेच त्यांच्या विरुद्ध विभागीय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे जयवंत देवराव पवार, मुख्य आरोग्य निरीक्षक यापदी कार्यरत असून, महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील स्वच्छतेच्या अनुुषंगाने कामकाज करणे त्यांचे कर्तव्य होते; परंतु त्यांच्याकडून कर्तव्यात वारंवार दुर्लक्ष होत होते, तसेच कामकाजाकरिता कराव्या लागणाऱ्या प्रशासकीय कार्यवाहीला विलंब करीत असत, तसेच वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करता हलगर्जीपणा करीत होते, असा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.महापालिकेच्या १०४ ऑटो टिपर वाहनांची वित्तीय नियतीचा अवलंब न करता ८७.५९ लाखाची लायबलिटी मनपावर टाकल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यांनी मंजूर रकमेपेक्षा अतिरिक्त खर्च केला होता. त्यास वरिष्ठांची मंजुरीही घेतली नाही, तसेच त्यांच्या निदर्शनासही ही गोष्ट आणून दिली नाही. ही बाब गंभीर असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मंजुरीपेक्षा जादा रक्कम टिपर रिक्षावर खर्च करण्याच्या त्यांच्या कृतीची चौकशी होणार असून त्याकरिता प्रशासनाने अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे.त्यांच्याकडून घडलेल्या गंभीर बाबीची दखल घेऊन पवार यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ५६ मधील पोटकलम (२) (क) नुसार सेवेतून विभागीय चौकशीचे अधीन राहून निलंबित करण्यात आले आहे. पवार यांनी निलंबित काळात परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये असे बंधनही घालण्यात आले आहे.
प्रमाणापेक्षा जादा खर्च करणे भोवले, कोल्हापूर महापालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 15:55 IST