भारतभर 'हिंदवी स्वराज्य' हीच होती छत्रपती शिवरायांची इच्छा; ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव यांची नव्या शिवचरित्रात मांडणी
By समीर देशपांडे | Updated: February 19, 2026 16:11 IST2026-02-19T16:11:11+5:302026-02-19T16:11:59+5:30
इंग्रजांना विरोध तर फ्रेंचांविषयी सौम्य भूमिका

भारतभर 'हिंदवी स्वराज्य' हीच होती छत्रपती शिवरायांची इच्छा; ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव यांची नव्या शिवचरित्रात मांडणी
समीर देशपांडे
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ महाराष्ट्रात नव्हे तर भारतभर हिंदवी स्वराज्य स्थापन करायचे होते, अशी मांडणी प्रसिद्ध इतिहास संशोधक, लेखक डॉ. रमेश जाधव यांनी आपल्या नव्या शिवचरित्रामध्ये केली आहे. लवकरच प्रत्येकी ६०० अशा १२०० पानांच्या दोन खंडातील या शिवचरित्राचे प्रकाशन होणार आहे. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला त्यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
डॉ. जाधव यांनी २००७ पासून शिवचरित्र लेखनाला सुरुवात केली. परंतु, मधली तीन वर्षे शाहू गौरव ग्रंथासाठी त्यांना द्यावी लागली. त्यानंतर त्यांनी पुन्हा शिवचरित्राला वाहून घेतले. आम्ही या हिंदुस्थानचे मालक आहोत. तुम्ही परप्रांतातून आमच्यावर आक्रमण करण्यासाठी आला आहात. जर तुम्ही सरळपणाने परत जाणार नसाल तर आम्हांला तुमच्याशी संघर्ष करावा लागेल हीच शिवाजी महाराजांची भूमिका होती.
ते सरसकट मुस्लीमविरोधक नव्हते. तसे असते तर त्यांनी मशिदी बांधल्या नसत्या, मशिदींना देणग्या दिल्या नसत्या. औरंगजेबाचा पाडाव करण्यासाठी त्यांनी प्रसंगी आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाहीचीही मदत घेतली. एकदा का औरंगजेब पडला की इतरांना पाहून घेता येईल, अशी त्यांची भूमिका होती, असे डॉ. जाधव म्हणाले.
अधिकाधिक पुरावे
हे शिवचरित्र अधिकाधिक पुराव्यांच्या आधारे लिहिण्यात आले आहे. याआधीच्या सुमारे ४० मान्यवरांनी शिवचरित्र लिहिले आहे. त्यातील त्रुटी काढण्याचा माझा अधिकार नाही. परंतु, शेन यांनी लिहिलेल्या ‘फॉरेन बायोग्राफी ऑफ शिवाजी’ इथपासून कृष्णाजी केळुसकर यांच्या ग्रंथापर्यंतचा संदर्भ घेतल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.
फ्रेंचाविषयी भूमिका सौम्य
इंग्रज, पोर्तुगीज आणि फ्रेंच यांच्याबाबत महाराजांची भूमिका काय होती हे सांगताना डॉ. जाधव म्हणाले, भारतावर ज्यांनी ज्यांनी आक्रमण केले,त्यांच्याविरोधात शिवाजी महाराज होते. त्यामुळे इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्याविरोधात त्यांनी उघड भूमिका घेतली होती. फक्त फ्रेंचांबाबत त्यांची भूमिका सौम्य होती. कारण वेळोवेळी फ्रेंचांनी महाराजांना मदत केली होती. उलट इंग्रजांनी मात्र नेहमी महाराजांच्या विरोधकांना मदत केली होती. म्हणून शिवाजी महाराज हे इंग्रजांचे विरोधक होते.