कोल्हापुरात शिवमय वातावरणात छत्रपती शिवराय, ताराराणींचा रथोत्सव, शिवप्रेमींचा उदंड उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 15:07 IST2025-04-15T15:07:20+5:302025-04-15T15:07:42+5:30

जयघोषात दुमदुमला भवानी मंडप

Chhatrapati Shivaji Maharaj chariot festival in Kolhapur, great enthusiasm of Shiva lovers | कोल्हापुरात शिवमय वातावरणात छत्रपती शिवराय, ताराराणींचा रथोत्सव, शिवप्रेमींचा उदंड उत्साह

कोल्हापुरात शिवमय वातावरणात छत्रपती शिवराय, ताराराणींचा रथोत्सव, शिवप्रेमींचा उदंड उत्साह

कोल्हापूर : छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेला छत्रपती शिवाजी महाराज आणि करवीर संस्थापिका रणरागिणी ताराराणी यांचा रथोत्सव शिवमय वातावरणात पार पडला. आकर्षक रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या, ऐतिहासिक वेशभूषेतील लवाजमा, वाद्यांचा गजर आणि नयनरम्य आतषबाजीने वातावरण उत्साही बनले होते. छत्रपती शिवराय आणि रणरागिणी ताराराणी यांच्या जयघोषाने भवानी मंडप दुमदुमला.

दरवर्षी चैत्र पौर्णिमेनंतर दुसऱ्या दिवशी छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि करवीर संस्थापिका ताराराणी यांच्या रथोत्सवाचे आयोजन केले जाते. सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास खासदार शाहू छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत भवानी मंडपातून रथोत्सवाला सुरुवात झाली. फुलांनी सजवलेल्या रथात छत्रपती शिवाजी महाराज आणि ताराराणी यांच्या प्रतिमा होत्या.

छत्रपती शिवराय आणि ताराराणी यांच्या जयघोषात उपस्थितांनी रथ ओढण्यास सुुरुवात केली. फुलांच्या पायघड्यांवरून रथ पुढे सरकला. महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलमार्गे बालगोपाल तालीम मंडळ येथे रथाचे जोरदार स्वागत झाले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ढोलताशा पथकाच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, गुजरीमार्गे रथ पुन्हा भवानी मंडपात पोहोचल्यानंतर रथोत्सवाची सांगता झाली.

यावेळी खासदार शाहू छत्रपती यांच्यासह संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, शहाजीराजे, यशराजराजे, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, रणजित परमार, राजाराम गायकवाड, राजू मेवेकरी, संजय पवार, हर्षल सुर्वे आदी उपस्थित होते.

जयघोषाने वाढवला उत्साह

उत्साही वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज आणि रणरागिणी ताराराणी यांचा रथोत्सव झाला. 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'महाराणी ताराराणी की जय', 'तुमचं आमचं नात काय, जय भवानी जय शिवराय' या जयघोषाने रथोत्सवाचा उत्साह वाढला.

बालचमूंचा सहभाग

रथोत्सवाच्या मार्गावर विविधरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. अभूतपूर्व उत्साहात साजरा झालेल्या रथावर पुष्पवृष्टीही करण्यात आली. यावेळी लहान मुले छत्रपती शिवाजी महाराज आणि ताराराणी यांची वेशभूषा करून सहभागी झाले होते.

नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

रथोत्सव मार्गावर नागरिकांनी ठिकठिकाणी रथाचे उत्स्फूर्त स्वागत केले. चौकांमध्ये भगव्या झेंड्यांसह छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा आणि आकर्षक रांगोळ्या साकारल्या होत्या. नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि जयघोषाने रथोत्सव लक्षणीय बनला.

Web Title: Chhatrapati Shivaji Maharaj chariot festival in Kolhapur, great enthusiasm of Shiva lovers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.