संभाजीनगरमध्ये घरफोडी, पंधरा तोळ्यांचा ऐवज लंपास, कोल्हापुरच्या नागरिकांत भितीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 15:59 IST2017-11-06T15:50:53+5:302017-11-06T15:59:43+5:30
कोल्हापुर शहरातील संभाजीनगर परिसरातील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी पंधरा तोळे सोन्याचे दागिने, दोन मोबाईल व रोख रक्कम लंपास केली. सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. शहरात घरफोड्यांनी धुमाकूळ घातला असतानाही पोलीस सुस्त आहेत. या वाढत्या घरफोड्यांमुळे नागरिकांत भिती पसरली आहे.

संभाजीनगरमध्ये घरफोडी, पंधरा तोळ्यांचा ऐवज लंपास, कोल्हापुरच्या नागरिकांत भितीचे वातावरण
कोल्हापूर ,दि. ०६ : संभाजीनगर परिसरातील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी पंधरा तोळे सोन्याचे दागिने, दोन मोबाईल व रोख रक्कम लंपास केली. सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. शहरात घरफोड्यांनी धुमाकूळ घातला असतानाही पोलीस सुस्त आहेत. या वाढत्या घरफोड्यांमुळे नागरिकांत भिती पसरली आहे.
सुनिता शंकर ससे (वय ६०) त्यांचा मुलगा अमित असे दोघेच राहतात. सुनिता यांच्या बहिणीचे निधन झाले आहे. तिची मुलगी वर्षा मांगलेकर (रा. उचगाव, ता. करवीर) ही बाळंतपणासाठी त्यांच्या घरी आली होती. तीन दिवसापूर्वी संभाजीनगर परिसरातील एका खासगी रुग्णालयात वर्षाची प्रसुत्ती झाली. त्यामुळे सुनिता ह्या रात्री झोपण्यासाठी रुग्णालयात जात होत्या.
अमित हा एकटाच घरी असे. तो नेहमीप्रमाणे सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास वृत्तपत्र टाकण्यासाठी घराला कुलूप लावून बाहेर पडला. सकाळी सातच्या सुमारास सुनिता ह्या रुग्णालयातून घरी आल्या असता दरवाजा उघडा दिसला. त्याचे कुलूप तुटलेले होते. आतमध्ये पाहिले असता कपाटातील साहित्य विस्कटले होते.
वर्षा हिने रुग्णालयात जाण्यापूर्वी अंगावरील गंठण, ब्रेसलेट, लक्ष्मीहार, कर्नफुले, अंगठ्या असे सुमारे पंधरा तोळे सोन्याचे दागिने, दोन मोबाईल व रोख पंधराशे रुपये पिशवीत घालून कपाटात ठेवले होते. ती पिशवी चोरट्यांनी लंपास केली. घरात चोरी झाल्याचे पाहून सुनिता यांना धक्काच बसला.
आक्रोश करीत त्यांनी शेजारील लोकांना बोलावून घेतले. त्यानंतर जुना राजवाडा पोलीसांना वर्दी दिली. शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पोलीस निरीक्षक निशिकांत भूजबळ यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. डॉगस्कॉडने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. परंतू श्वान जाग्यावरच घुटमळले. ठसेतज्ज्ञांनी दरवाजा, कपाटावरील चोरट्यांच्या हाताचे ठसे घेतले.
पहाटेच्या घरफोड्या
गेल्या महिन्याभरात शहरात घरफोड्यांचे प्रमाण वाढते आहे. पोलीस रात्री एक-दोन वाजेपर्यंत गस्त घालताता. त्यानंतर ते झोपायला जातात. मध्यरात्री अडीच नंतर एकही पोलीस रस्त्यावर नसतो. याच संधीचा फायदा चोरटे उठवितात. पहाटे तीन ते साडेचारच्या सुमारास बहुतांशी घरफोड्या झाल्या आहेत. वाढत्या घरफोड्या रोखण्यासाठी पोलीस कोणतेही पाऊल उचलताना दिसत नाहीत.