कोल्हापूर : मशिदीवरील भोंगे उतरवावेत ही राज ठाकरे यांची मागणी ही अन्य धर्मावरील आक्रमण नव्हे अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या मागणीला पाठबळ दिले आहे. यासारख्या मागण्या याआधीच भाजपने केल्याचेही त्यांनी सांगितले. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे उपस्थित होते.यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, १९२५ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेनंतर राममंदिर, ३७० वे कलम, तिहेरी तलाक, नागरिक संशोधन कायदा यासारख्या मागण्या करण्यात आल्या होत्या. एका देशात दोन देश तयार करण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत ते पाहता ठाकरे यांची मागणी योग्य आहे. कोणत्याही धर्मावर आक्रमण नको आणि कोणाचे लांगूनचालन नको हीच आमची भूमिका आहे.राष्ट्रवादीकडे त्यांनी केलेली सांगण्याजोगी अनेक कामे आहेत. परंतू त्यांचेही अनेक जण समाज फोडण्याचीच भाषा करतात. कोल्हापुरातसुध्दा अमुक ठिकाणी टेबलच लावू देणार नाही अशी भूमिका घेतली जाते ती चुकीची आहे. महाविकास आघाडी आमच्याशी संबंधित अनेकांवर गुन्हे दाखल करायची आणि नंतर न्यायालयात तोंडावर आपटण्याची एकही संधी सोडत नाही असा टोला पाटील यांनी लगावला. वाढत्या भारनियमनामुळे वाट लागणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
मशिदीवरील भोंगे उतरवण्याच्या राज ठाकरेंच्या मागणीला चंद्रकांतदादांचे पाठबळ, म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 14:13 IST