...ही तर भाजप अडचणीत असल्याची चंद्रकांतदादांची कबुली; धैर्यशील मानेंवरून राजू शेट्टींचा गौप्यस्फोट
By विश्वास पाटील | Updated: March 6, 2023 13:33 IST2023-03-06T13:31:49+5:302023-03-06T13:33:23+5:30
राजू शेट्टी यांचा टोला : धैर्यशील माने यांच्या उमेदवारीस भाजपचाच विरोध

...ही तर भाजप अडचणीत असल्याची चंद्रकांतदादांची कबुली; धैर्यशील मानेंवरून राजू शेट्टींचा गौप्यस्फोट
कोल्हापूर : माजी खासदार राजू शेट्टी यांची किंवा त्यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आता अचानक भाजप नेते व मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना आठवण व्हावी ही तर लोकसभा निवडणूकीसाठी भाजप अडचणीत असल्याची प्रत्यक्ष कबुलीच असल्याचा टोला माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी लगावला. मंत्री पाटील यांनी रविवारी कोल्हापूरात आमचा शेट्टी यांच्याशी संवाद आहे व ते आमच्यासोबत येतील असा विश्र्वास व्यक्त केला होता.
भाजपला आता शेट्टी यांची गरज का भासू लागली आहे अशी विचारणा लोकमतने राजू शेट्टी यांना केली. त्यावर ते म्हणाले, त्याची नक्कीच कांही महत्वाची कारणे आहेत. मी हातकणंगले लोकसभा मतदार संघाचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवार असताना चंद्रकांतदादा आता मला महायुतीसोबत या म्हणत आहेत याचाच अर्थ खासदार धैर्यशील माने हे आता निवडून येवू शकत नाहीत अशी भाजपला खात्री वाटत आहे. म्हणूनच त्यांनी पर्यायी उमेदवाराचा शोध सुरु केला आहे. खासदार माने ही भाजपची चॉईस नाही असाही मंत्री पाटील यांच्या विधानाचा स्पष्ट अर्थ आहे. शिवसेनेतून गद्दारी केलेल्या लोकांचे काय होते हे महाराष्ट्राने पाहिले, अनुभवले आहे. खेड (जि.रत्नागिरी) येथे उध्दव ठाकरे यांच्या सभेला मिळालेला प्रतिसाद पाहता महाराष्ट्रात काय घडणार आहे याचीच चुणूक दिसत आहे. त्याची चाहूल लागल्यानेच मंत्री पाटील किंवा भाजपला आता मित्रपक्षांची आठवण होवू लागली आहे..अन्यथा मागच्या चार वर्षात भाजपवाल्यांच्या तोंडात रासप, शेतकरी संघटना हा शब्द ही महाराष्ट्राला ऐकायला मिळाला नाही. आता ज्यांना सोबत घेतले आहे, त्यांना घेवून दोन्ही निवडणूका जिंकता येणार नाहीत हे भाजपच्या लक्षात आल्यानेच त्यांना राजू शेट्टी, महादेव जानकर यांची नांवे लक्षात यायला लागली आहेत. एकाअर्थाने भाजपच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याचेच हे लक्षण आहे.
आगामी लोकसभा निवडणूकीत आम्ही एकला चलो रे...ही भूमिका घेवूनच मैदानात उतरु..आमचं ठरलं आहे. त्यात बदल नाहीच. महायुतीही नको व महाविकास आघाडीही नको. शेतकऱ्यांच्या प्रश्र्नांसाठी संघर्ष करणारा, प्रश्र्न मांडणारा लोकप्रतिनिधी तुम्हांला हवा असेल तरच मला निवडून द्या अशीच भूमिका घेवून लोकांकडे जायचे निश्चित केले आहे असे माजी खासदार शेट्टी यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, भाजपच्या आघाडीत आम्ही होतो आणि जेवढा त्यांचा आम्हांला राजकीय लाभ झाला तेवढाच त्यांनाही संघटनेच्या प्रभावाचा झाला. शेतकऱ्यांसाठी मोदी कांहीतरी चांगले करतील असे वाटले म्हणून त्यांच्यासोबत गेलो. परंतू तिथे भ्रमनिरास झाल्यावर भाजपची संगत सोडली. तुमच्या सत्तेतून आम्ही बाहेर पडलो. सदाभाऊ खोत यांनी नकार दिल्यावर त्यांनाच संघटनेतून काढून टाकले. भाजपची संगत सोडल्यावर भाजपने संघटना संपवण्याचा प्रयत्न केला. खोत यांच्यासारखे बांडगूळ आमच्याविरोधात उभे करून संघटना जातीयवादी असल्याचे आरोप केले. कार्यकर्त्यांना जेवढा त्रास देता येईल तेवढा दिला. परंतू तरीही आम्ही त्यांना पुरून उरलो. गेल्या लोकसभा निवडणूकीत इचलकरंजीच्या पाणी प्रश्र्नांवरून मला आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे कारस्थान भाजपचेच. लोकसभेला भाजपने माझा पराभव केला तरी कोल्हापूरच्या जनतेने विधानसभेला भाजपला जिल्ह्यातून हद्दपार केले. त्याची कळ जिव्हारी लागली असावी म्हणूनच मंत्री पाटील यांना आता आमची आठवण झाली असेल असाही टोला शेट्टी यांनी लगावला.
संवाद कसला..? खोटा भ्रम
मंत्री पाटील हे आपला शेट्टी यांच्याशी चार वर्षे संवाद असल्याचे सांगून खोटा भ्रम लोकांत तयार करत असल्याचे सांगून शेट्टी म्हणाले, मागच्या चार वर्षात मंत्री पाटील यांच्या मातोश्रींचे निधन झाल्यानंतर माणुसकीच्या नात्याने सांत्वनासाठी त्यांना भेटलो. त्याव्यतिरिक्त त्यांना कधी साधा एक फोनही मी केलेला नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे माझ्या शिरोळमधील घरी आले ते माझे त्यांच्याशी गेल्या वीस वर्षातील राजकारणविरहित कौटुंबिक संबंध आहेत म्हणून. त्यांनी माझ्या घरी येवू नयेत यासाठीही अनेकांनी फिल्डिंग लावली होती हे मंत्री पाटील यांनाही कदाचित ज्ञात असावेच. असे असताना शेट्टी यांचा आमच्याशी संवाद असतो असे सांगून लोकांत भ्रम तयार करण्याचा हा भाजपचा कुटिल डाव आहे.
किंमत चुकती केली..
गेल्या लोकसभेच्या आधीच आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपला अंगावर घेतले. त्याची किंमत आम्ही चुकती केली व त्याचा आम्हांला किंचितही पश्चाताप नाही. कारण सत्तेचा मोह कधीच नव्हता. त्यामुळे आता पुन्हा त्यांच्या वाट्याला जाण्याचा प्रश्र्नच येत नाही..पैरा एकदाच होतो. त्यात फसवणूक झाली की शेतकरी स्वत:च बैलाची जुपी करतो..तो कुणासाठी थांबत नाही..