चंदगडला कोरोनाचा काजू उद्योगाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:23 IST2021-05-12T04:23:26+5:302021-05-12T04:23:26+5:30

नंदकुमार ढेरे । चंदगड कोट्यवधी रूपयांची उलाढाल होणाऱ्या चंदगड तालुक्यातील काजू उद्योगाला कोरोना महामारीचा सलग दुसऱ्या वर्षीही फटका बसला ...

Chandgad hit Corona's cashew industry | चंदगडला कोरोनाचा काजू उद्योगाला फटका

चंदगडला कोरोनाचा काजू उद्योगाला फटका

नंदकुमार ढेरे ।

चंदगड

कोट्यवधी रूपयांची उलाढाल होणाऱ्या चंदगड तालुक्यातील काजू उद्योगाला कोरोना महामारीचा सलग दुसऱ्या वर्षीही फटका बसला आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. सतत बदलणारे हवामान, दाट धुक्यामुळे काजू उत्पादनात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे शेतकरी व काजू कारखानदार मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. तसेच या उद्योगावर अवलंबून असणाऱ्या कामगारांवर ही बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

दोन वर्षांपूर्वी व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात काजूचा साठा होता. दरवर्षीच्या जमा-खर्चाचा ताळमेळ घालून शेतकऱ्यांनी काजू उत्पादन चांगले होईल या आशेने मुलांची लग्ने जमवली आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी तसेच काजू-खरेदी व्यापारी व कारखानदारांनीही बँकांकडून लाखो रुपयांची कर्जे उचलली आहेत.

काजू बागामध्ये दिवसभर फिरून २ किलो काजू जमा होत नसल्याने मजुरीही मिळेनाशी झाली आहे. काजू देतो असे सांगून व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांनी काजू पोटी काही रक्कम घेतली आहे. त्याची परतफेड कशी करावी या विवंचनेत शेतकरी आहे.

गतवर्षी काजूलाही प्रति किलो ७० ते ९० रुपये दर होता. आणि काजू उत्पन्नही चांगले होते. यावर्षी काजू उत्पन्न कमी असल्यामुळे प्रति किलो ९० ते ११० रूपयांपर्यंत दर मिळत आहे.

-

-----------------------

काेट...

* काजू उत्पादन घटल्याने काजू कारखानदारी अडचणीत आली आहेत. छोटे कारखानदार कारखाने बंद करण्याच्या मार्गावर आहेत. आर्थिक मंदी जून अखेरपर्यंत राहिली तर मोठ्या कारखानदारांना याचा सामना करावा लागणार आहे. याचा फटका कारखान्यात काम करणाऱ्या महिला कामगारांना बसणार आहे. एकंदरीत कारखानदार, व्यापारी, शेतकरी मजूर अडचणीत येणार आहेत.

- शामराव बेनके, काजू कारखानदार, माणगाव.

-----------------

केळी, द्राक्ष, कापूस आदी पिकांची निसर्गाने हाल झाले तर शासन नुकसान भरपाई देते. मात्र, राज्याच्या कोकण पट्ट्यातील काजू उत्पादकांना भरपाई मिळत नाही. गेल्यावर्षी कोकणातील काजू उत्पादकांना शासनाने नुकसान भरपाई दिली होती. त्याचप्रमाणे कोकणाशी संलग्न असणाऱ्या चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी.

- नितीन पाटील, बळीराजा, शेतकरी संघटना

------------------------

* चंदगडला मद्यार्क निर्मितीच्या कारखान्यांची गरज

तालुक्यात सरासरी १० हजार टन काजू बिचे तर ४२ हजार टन काजू बोंडाचे (मुरटा) उत्पादन होते. काजू बोंडांची गोव्याचे कारखानदार कवडीमोल दराने खरेदी करतात. यामध्ये दलाल, व्यापारी आणि मद्यार्क निर्मिती कारखानदार आजपर्यंत मालामाल झालेत. काजू पिकवणारा शेतकरी मात्र कंगालच राहिला आहे. गोवा राज्याप्रमाणेच महाराष्ट्र शासनाकडून काजूच्या फळावर योग्य प्रक्रिया करण्यास परवानगी मिळत नाही. त्यामुळे चंदगड तालुक्यातील सुमारे ४२ हजार टन काजू बोंड (मुरटा) जातो. विक्रमी उत्पादन लक्षात घेता राज्य सरकारने चंदगडला मद्यार्क निर्मितीच्या कारखान्यांना परवानगी द्यावी.

- उदयकुमार देशपांडे, माजी अध्यक्ष, गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समिती.

Web Title: Chandgad hit Corona's cashew industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.