एका सहीच्या प्रमाणपत्राचा निर्णय कुलगुरुंचा; मंगळवारपासून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 18:38 IST2019-04-11T18:36:50+5:302019-04-11T18:38:44+5:30
एका सहीचे पदवीप्रमाणपत्र छपाईचा निर्णय कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांचा आहे. त्यांनी त्याबाबत प्रशासनाला तोंडी आदेश दिले. त्यांनी बेकायदेशीर, आर्थिक गैरव्यवहार केला

एका सहीच्या प्रमाणपत्राचा निर्णय कुलगुरुंचा; मंगळवारपासून आंदोलन
कोल्हापूर : एका सहीचे पदवीप्रमाणपत्र छपाईचा निर्णय कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांचा आहे. त्यांनी त्याबाबत प्रशासनाला तोंडी आदेश दिले. त्यांनी बेकायदेशीर, आर्थिक गैरव्यवहार केला असल्याचा आरोप शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) केला आहे. डॉ. शिंदे यांना कुलगुरु पदावरुन हटविण्याच्या मागणीसाठी मंगळवार (दि. १६) पासून आंदोलन सुरु केले जाणार असल्याची माहिती सुटाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरुण पाटील, सहकार्यवाह सुभाष जाधव आणि सल्लागार सुधाकर मानकर यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
अरुण पाटील म्हणाले, प्रशासकीय गैरव्यवहारांबाबतच्या कारवाईस दिरंगाई कुलगुरुंकडून होत आहे. त्यांचे प्रमाद वाढत आहे. त्यामुळे त्यांना पदावरुन हटविण्याच्या मागणीसाठी सुटाने पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. सुभाष जाधव म्हणाले, विद्यापीठ हित बाजूला ठेऊन कुलगुरुंचे काम सुरु आहे. त्यांच्या तोंडी आदेशानुसार एका सहीची पदवीप्रमाणपत्रांची छपाई करण्यात आली. त्यामुळे विद्यापीठाला आर्थिक भुर्दंड बसला आहे. त्यांच्या कामकाजाविरोधातील आंदोलन टप्प्याटप्याने तीव्र केले जाईल.
सुधाकर मानकर म्हणाले, प्रमाणपत्र दुबार छपाई प्रकरणाबाबतच्या चौकशी समितीचा अहवाल चुकीचा आहे. या अहवालाची सुटाने मागणी केली आहे. तो मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. या पत्रकार परिषदेस डी. एन. पाटील, आर. जी. कोरबू, प्रकाश कुंभार, आदी उपस्थित होते.
चुकीचे आरोप, विद्यापीठाची बदनामी
दरम्यान, याबाबत कुलगुरु डॉ. शिंदे म्हणाले, सुटा संघटनेने जे आरोप केले आहेत ते चुकीचे आणि खेदजनक आहेत. सर्व घटकांना बरोबर घेऊन विद्यापीठ प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. अशावेळी विद्यापीठाची बदनामी करण्याचे काम सुटाकडून सुरु आहे. प्रमाणपत्र दुबार छपाई प्रकरणाबाबत विद्यापीठ प्रशासनाची कार्यवाही सुरु आहे.