केंद्रीय पथकाकडून सावित्रीबाई फुले लसीकरण केंद्राची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 19:19 IST2021-07-15T19:18:45+5:302021-07-15T19:19:22+5:30
CoronaVirus In Kolhapur : केंद्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत आलेल्या केंद्रीय समितीने गुरुवारी महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातील लसीकरण केंद्राला भेट देऊन तेथील लसीकरणाच्या कार्यक्रमाची माहिती घेतली. प्रत्येक दिवशी पन्नास हजार नागरिकांना लस देण्याची महापालिकेची व्यवस्था पाहून या पथकाने समाधान व्यक्त केले.

केंद्रीय पथकाकडून सावित्रीबाई फुले लसीकरण केंद्राची पाहणी
कोल्हापूर : केंद्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत आलेल्या केंद्रीय समितीने गुरुवारी महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातील लसीकरण केंद्राला भेट देऊन तेथील लसीकरणाच्या कार्यक्रमाची माहिती घेतली. प्रत्येक दिवशी पन्नास हजार नागरिकांना लस देण्याची महापालिकेची व्यवस्था पाहून या पथकाने समाधान व्यक्त केले.
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात येत नसल्याची दखल केंद्र शासनाच्या पातळीवर घेण्यात आली असून गुरुवारी हे केंद्रीय पथक कोल्हापुरात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक संपल्यानंतर पथकातील सदस्यांनी सावित्रीबाई फुले रुग्णालयातील लसीकरण केंद्रास भेट दिली. तेथील लसीकरणाच्या कार्यक्रमाची त्यांनी माहिती घेतली.
आयडीएसपी इंचार्ज डॉ. प्रदीप आवटे, आरोग्य उपसंचालक डॉ. प्राणिल कांबळे, अखिल भारतीय वैद्यक संस्थेचे सहायक प्राध्यापक डॉ. सत्यजित साहू यांचा पथकात समावेश होता. यावेळी जागितक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. हेमंत खरणारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, उपायुक्त निखिल मोरे, उपायुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त शिल्पा दरेकर, आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पावरा, वैद्यकीय अधिकारी डॉ. रुक्सार मोमीन, लसीकरण नोडल अधिकारी डॉ. अमोलकुमार माने, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. फारुख देसाई, पथकाने सावित्रीबाई फुले रुग्णालयातील नागरी आरोग्य केंद्र भेट देऊन लसीकरण याबाबतचा सविस्तर आढावा घेतला.