जीएसटीमधील १२ टक्क्यांचा टप्पा हटवण्याचा केंद्राचा विचार, फेरबदल झाल्यास हजारच्या आतील वस्तू होणार स्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 12:29 IST2025-07-04T12:29:07+5:302025-07-04T12:29:25+5:30
मध्यमवर्गीयांना होणार लाभ

जीएसटीमधील १२ टक्क्यांचा टप्पा हटवण्याचा केंद्राचा विचार, फेरबदल झाल्यास हजारच्या आतील वस्तू होणार स्वस्त
कोल्हापूर : वस्तू व सेवाकर (जीएसटी) प्रणालीतील बारा टक्क्यांचा टप्पा (स्लॅब) हटविण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे तसे झाल्यास मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. स्थानिक बाजारपेठेतही या करप्रणालीचा मोठा परिणाम होणार आहे. जीएसटी कमी झाल्यास थेट ग्राहकांना फायदा होणार आहे.
सध्या ०, ५, १२, १८ आणि २८ टक्के असे जीएसटीचे पाच स्लॅब आहेत. त्यामधील १२ टक्क्यांचा स्लॅब पूर्णपणे रद्द होऊ शकतो किंवा सध्या १२ टक्के कर आकारणाऱ्या वस्तू ५ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये येऊ शकतात.
गरीब, मध्यमवर्गीयांना लागणाऱ्या असंख्य वस्तूंचा समावेश बारा टक्क्यांच्या श्रेणीत होतो. एक हजार रुपये किमतीच्या आतील तयार कपडे, पावडर, छत्री, शिलाई मशीन, प्रेशर कुकर, स्वयंपाकाची भांडी, इस्त्री, गिझर, कमी क्षमतेच्या वॉशिंग मशीन, सायकल, स्टेशनरी वस्तू, सिरॅमिक टाइल्स, कृषी उपकरणे, टूथपेस्ट, केसांना लावण्यात येणारे तेल ते चप्पल, लस्सी, नॅपकिन यांसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे.
होलसेल आणि रिटेल मार्केट
एक हजार रुपये किमतीच्या आत असलेल्या वस्तूंचे मोठे रिटेल मार्केट कोल्हापुरात आहे. मुंबई, गुजरात, दिल्लीमधून मोठ्या प्रमाणात वस्तू आयात केल्या जातात. पाचशेहून अधिक होलसेल व्यापारी तर पाच हजारांहून अधिक रिटेल विक्रेते आहेत. त्याचा थेट फायदा ग्राहकांना होणार आहे.
जीएसटीत बदल झाल्यास कमी किमतीत वस्तू मिळतील. त्याचा थेट फायदा ग्राहकांना होतो. मात्र, केंद्र सरकारने जीवनावश्यक असलेल्या सर्वंच वस्तूंना जीएसटीतून वगळण्याची गरज आहे. - संजय शेटे, अध्यक्ष कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स
जीएसटीची पुर्नरचना करताना ग्राहक, उत्पादकांना विचार करणे गरजेचे आहे. सामान्य माणसाला जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या सर्वच वस्तू जीएसटीतून मुक्त करण्याची गरज आहे. त्याला एक हजार रुपयांपर्यंतचे बंधन नसावे. - बाबा खोडवे, सचिव, मराठी चेंबर्स ऑफ कॉमर्स