कुरुंदवाडला एक कक्ष; दोन दावेदार
By Admin | Updated: March 8, 2017 00:01 IST2017-03-08T00:01:07+5:302017-03-08T00:01:07+5:30
वाद चिघळणार : कुरुंदवाड पालिकेतील चित्र

कुरुंदवाडला एक कक्ष; दोन दावेदार
गणपती कोळी --कुरूंदवाड -येथील पालिकेतील विरोधी पक्ष कक्षाचा वाद अद्यापही चालूच आहे. पालिकेतील विरोधी पक्षांनी उपनगराध्यक्ष कक्षावर लावलेला फलक चार दिवसांपूर्वी गायब झाला होता. त्यामुळे वाद संपला, असे मानले जात असताना विरोधकांनी सोमवारी केवळ कक्ष दरवाजावरच नव्हे, तर कक्षातील टेबल व कक्षामध्येही विरोधी पक्षनेत्यांचे फलक लावल्याने वाद पुन्हा चिघळणार, हे मात्र निश्चित झाले आहे. त्यामुळे ‘एक फुल दो माली’ याप्रमाणे ‘एक कक्ष दोन दावेदारां’ची चर्चा आता शहरापुरती नव्हे, तर तालुक्यात रंगली आहे. पालिका निवडणुकीत सत्तेपासून थोडक्यात हुकलेल्या भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले आहे. निवडणुकीत भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशी तिरंगी लढत लागली असली, तरी निवडणुकीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली आहे. काँग्रेसचे जयराम पाटील नगराध्यक्ष आहेत. तर राष्ट्रवादीचे जवाहर पाटील उपनगराध्यक्ष आहेत.
नगराध्यक्ष थेट निवडीत ‘भाजप’चे उमेदवार रामचंद्र डांगे थोडक्यात पराभूत झाल्याने पराभव जिव्हारी लागला आहे. मात्र, पक्षाला चांगले यश मिळवून दिल्याने स्वीकृत सदस्यांतून डांगे पुन्हा पालिकेत आले आहेत. त्यामुळे विरोधी भूमिका अधिक तीव्र होणार, अशी राजकीय तज्ज्ञांतून शक्यता वर्तविली असताना पहिल्याच सर्वसाधारण सभेत किरकोळ विषयांवरून बाचाबाची होऊन उपनगराध्यक्ष जवाहर पाटील यांना डांगे यांनी मारहाण केली होती.
डांगे यांनी मारहाण करून सभागृह हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. त्यातच उपनगराध्यक्ष पाटील यांचा कक्ष विरोधी पक्षाला देण्याची मागणी डांगे यांनी केली होती. मात्र, त्यांच्या मागणीला नगराध्यक्ष जयराम पाटील यांच्यासह सत्ताधारी सदस्यांनी विरोध केला होता. त्यामुळे संतापलेल्या विरोधकांनी उपनगराध्यक्ष कक्षाच्या दरवाजावर विरोधी पक्षनेत्या सुजाता मालवेकर असा फलक लावला होता. चार दिवसांपूर्वी हा फलक अज्ञातांनी काढल्याने व पुन्हा विरोधकांकडून फलक न लावल्याने वाद मिटला, असा तर्क असताना सोमवारी सकाळी या कक्षाच्या दरवाजाबरोबरच कक्षातील टेबल व कक्षामध्येही विरोधी पक्षनेत्यांचे फलक लावल्याचे आढळून आले. त्यामुळे कक्ष वाद पुन्हा चिघळणार, हे निश्चित झाले आहे. पालिकेत ‘एक केबिन दोन दावेदार’ असा वाद चांगलाच रंगत आहे.
विशेष सभेत निर्णय
काही दिवसांपूर्वी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधी भाजपचे गटनेते रामचंद्र डांगे, नगरसेवक उदय डांगे यांनी किरकोळ विषयावरून उपनगराध्यक्ष जवाहर पाटील यांना सभागृहातच मारहाण केल्याने नगराध्यक्षासह सत्ताधारी नगरसेवकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
विरोधकांनी दबाव टाकून स्वत:च्या सोयीनुसार ठराव करून घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याला कायदेशीर उत्तर देण्याची तयारी सत्ताधारी यांनी ठेवली आहे.
त्यामुळे कक्ष मागणीवरून सभागृहाची विशेष सभा बोलाविण्याची शक्यता असून, तडजोडीने न मिटल्यास सत्ताधारी ऐनवेळी बहुमतावर निर्णय घेण्याची शक्यता आहे.