भारताचा विजयानंतर शिवाजी चौकात जल्लोष; ध्वनी यंत्रणा आणणाऱ्या रिक्षा चालकावर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 07:24 IST2025-09-22T07:23:12+5:302025-09-22T07:24:11+5:30
दुबई येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात हा सामना झाला. मात्र, सामना संपण्यापूर्वीच चाहते एकत्रितपणे छत्रपती शिवाजी चौकाच्या दिशेने येऊ लागले

भारताचा विजयानंतर शिवाजी चौकात जल्लोष; ध्वनी यंत्रणा आणणाऱ्या रिक्षा चालकावर कारवाई
संदीप आडनाईक
कोल्हापूर : आशिया चषक २०२५ क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानवर विजय मिळवताच कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवारी मध्यरात्री जय श्रीराम, वंदे मातरम्, भारत माता की जय अशा घोषणा देत क्रिकेटप्रेमींनी अर्धा तास जल्लोष केला.दरम्यान, सतर्क पोलिसांनी
ध्वनी यंत्रणा आणणाऱ्या रिक्षा चालकावर कारवाई केली.
दुबई येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात हा सामना झाला. मात्र, सामना संपण्यापूर्वीच चाहते एकत्रितपणे छत्रपती शिवाजी चौकाच्या दिशेने येऊ लागले. घोषणाबाजी, टाळ्या-शिट्ट्या, पिपाण्यांसह विविध प्रकारची वाद्ये घेऊन दुचाकी-चारचाकी वाहनांतून लहान मुले, तरुण व महिला-मुलींनी जल्लोषात सहभागी झाले. दुचाकीचे सायलेन्सर काढून अनेकजण चौकात जमले. हातात तिरंगा आणि भगवा झेंडा घेतलेल्या तरुणांनी नाचत आणि घाेषणा देत एकच गर्दी केली. लहान मुले आणि महिलांही मागे नव्हते. उंच ठिकाणी जाऊन जल्लोषाची छायाचित्रे व व्हिडीओ घेण्यात आले. मोबाईल कॅमेऱ्यावर अनेकांनी छोटे छोटे व्हिडिओ, रिल्स सोशल मिडियावर अपलोड केले. अनेकजण सेल्फी काढत होते.
क्रिकेटप्रेमींचे विशेष नियोजन...
सार्वजनिक व साप्ताहिक सुट्टीचा रविवार आणि भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार यामुळे क्रिकेटप्रेमींनी विशेष नियोजन केले होते.अनेकांनी एकत्रित बसून सामन्याचा आनंद लुटला. तालीम संस्था, तरुण मंडळांची कार्यालये, पेठांमधील मुख्य चौक, उद्याने, हॉटेल्स-रेस्टॉरंट व लॉन्समध्ये मोठ्या स्क्रीन लावून सामना पाहण्याचे नियोजन केले होते. नवरात्र सुरु होणार असल्यामुळे अनेकांनी रात्रीच्या चमचमीत जेवणाचेही नियोजन केले होते. भारताने सामना जिंकल्याने नियोजनाचा आनंद द्विगुणीत झाला.
बाराच्या ठोक्याला पोलिसांनी पांगवली गर्दी
नवरात्रीच्या अनुषंगाने पोलिसांनी शहरात कोठेही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी धार्मिक स्थळे, रस्त्यावर कडक बंदोबस्त ठेवला होता. छत्रपती शिवाजी चौकाकडे जाणार्या रस्त्यांवर शीघ्र कृती दलाचे दोन प्लॅटून बंदोबस्तासाठी तैनात होते. बाराच्या ठोक्याला रात्री चौकात जमलेल्या तरुणांना घरी जाण्याचे आवाहन करत पोलिसांनी येथील गर्दी पांगवली.
रिक्षा चालकावर कारवाई
दरम्यान, मध्यरात्री काही तरुण छत्रपती शिवाजी चौकामध्ये ध्वनीयंत्रणा आणण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना सतर्क पोलिसांनी अडवले. रिक्षामध्ये गाणी लावून ते सारेजण छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले, तेव्हा पोलिसांनी रिक्षा अडवली आणि चालकावर कारवाई केली. यावेळी जमलेल्या जमावाला पोलिसांनी पांगवले.