भाजप कार्यकर्त्यांचा कोल्हापूरात जल्लोष, गुजरात, हिमाचल प्रदेशमधील दणदणीत विजयाने आनंदोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 17:01 IST2017-12-18T15:45:14+5:302017-12-18T17:01:45+5:30
गुजरात व हिमाचलप्रदेश येथील विधानसभा निवडणूकीत मिळवलेल्या विजयाबद्दल कोल्हापूर शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी सोमवारी आनंदोत्सव साजरा केला. शिवाजी चौकात फटाक्याची आतिषबाजी करत जिलेबी वाटून कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

भाजप कार्यकर्त्यांचा कोल्हापूरात जल्लोष, गुजरात, हिमाचल प्रदेशमधील दणदणीत विजयाने आनंदोत्सव
कोल्हापूर : गुजरात व हिमाचलप्रदेश येथील विधानसभा निवडणूकीत मिळवलेल्या विजयाबद्दल कोल्हापूर शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी सोमवारी आनंदोत्सव साजरा केला. शिवाजी चौकात फटाक्याची आतिषबाजी करत जिलेबी वाटून कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
संपुर्ण देशाचे लक्ष लागलेल्या व पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या गुजरात विधानसभेचा सोमवारी सकाळी निकाल जाहीर झाला. यामध्ये भाजपने सलग सहाव्यांदा सत्ता कायम राखत हिमाचल प्रदेश हे राज्य कॉँग्रेस कडून हिसकावून घेतल्याने भाजप नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही.
कोल्हापूर महानगर भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयापासून ढोल ताशाच्या गजरात येऊन शिवाजी चौकात जल्लोष केला. नागरिकांना जिलेबीचे वाटप करून फटाक्याची आतिषबाजी केली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांच्यासह कार्यकर्त्यांनी ढोल ताशावर ठेका धरून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाला महत्व देऊन वाटचाल सुरू ठेवल्याने विरोधकांनी कितीही कांगावा केला तर देशातील सामान्य माणूस कोणाबरोबर आहे, हे अधोरिखित झाले आहे.
गुजरात निवडणूकीत विरोधकांनी भाजप व आमच्या नेत्यांबद्दल अपप्रचार केला पण जनता जागरूक आहे, विकासाच्या मागे उभी राहिल्याने मोठा विजयी संपादन झाला. यावेळी भाजपचे महापालिकेतील गटनेते विजय सुर्यवंशी, सुरेश जरग, अमोल पालोजी, आर. डी. पाटील आदी उपस्थित होते.